लग्नात जेवण कमी पडले; नवरदेवाच्या नातेवाईकास धू.. धू.. धुतले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:01 PM2019-12-03T17:01:08+5:302019-12-03T17:03:25+5:30
सोलापुरातील घटना; वधुकडील आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल
सोलापूर : हळदीच्या कार्यक्रमात जेवण कमी पडल्याने व दुसºया दिवशी लग्नात फोटो काढण्याच्या कारणावरून वराच्या नातेवाईकास बेदम मारहाण करण्यात आली. शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ हा प्रकार घडला असून, या प्रकरणी वधूकडील आठ जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परशुराम विठ्ठल व्हटकर, गंगाराम विठ्ठल व्हटकर, पंचप्पा धोंडीराम धडके, लखन नवनाथ इंगळे, अनिकेत नवनाथ इंगळे, धोंडीबा राम इंगळे, नवनाथ राम इंगळे व अन्य एक (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संतोष सुरेश कोकणे यांचे १ डिसेंबर रोजी शिवलिंग मंगल कार्यालयात लग्न होते. आदल्या दिवशी ३0 नोव्हेंबर रोजी हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हळदीसाठी मुलीकडील पाहुणे जास्त आले होते, सर्वांना जेवण पुरले नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता. नवरदेव संतोष कोकणे यांच्या मामाचा मुलगा रविकिरण विठ्ठल धडके हे जेवण वाढत होते. जेवण संपल्याने वधूकडील मंडळी त्यांच्यावर चिडून होती. रविवारी लग्नकार्य झाल्यानंतर दुपारी १.३0 वाजता फोटो काढण्याच्या कारणावरून रविकिरण धडके व चिदानंद धडके या दोघांना मारहाण झाली.या प्रकरणी रविकिरण धडके यांनी फिर्याद दिली असून, तपास सहायक फौजदार सरवदे करीत आहेत.