‘बर्ड फ्लू’विरोधात यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:09+5:302021-01-13T04:55:09+5:30
सोलापूर : कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला. मात्र, इतर देशांत कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्लूं ...
सोलापूर : कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला. मात्र, इतर देशांत कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्लूं हा संसर्गजन्य आजार पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील ९१ पशुधन विकास अधिकारी आणि १४२ पर्यवेक्षक पोल्ट्री व्यावसायिकांशी संपर्क साधून आढावा घेत आहेत.
पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता ‘बर्ड फ्लू’चे संकट घोंगावत आहे. या स्थितीत पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय १२ पथके नेमली आहेत. पशुसंवर्धन उपायुक्तही याचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यात २३ लाख कोंबड्यांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे. या संसर्गजन्य आजारावर पोल्ट्री व्यावसायिक खबरदारी घेत आहेत. दररोजची स्वच्छता आणि सॅनिटायझर केले जाते. ७३ सदस्यांची एक कमिटी असून, यामध्ये बहुतांश पशुवैद्यक अधिकारी आहेत.
कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसायच ठरतो, असे समीकरणच तयार झाले आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनावेळीदेखील चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, असा अपप्रचार झाला आणि काही ठिकाणी पोल्ट्री व्यावसायिकांनी जिवंत कोंबड्या गाडून टाकल्या. काहींनी मोफत वाटल्या. कोरोनाने या व्यवसायाला पूर्वार्धाच्या टप्प्यात उद्ध्वस्त केले तरी, उत्तरार्धात मात्र चिकन आणि अंडी खाऊनच कोरोनाशी लढता येते, असा प्रचार झाल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा स्थिर होत होता. २०१७-१८ मध्ये राज्यात ‘बर्ड फ्लू’ने थैमान घातले होते. दक्षता म्हणून अनेक व्यावसायिक निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवीत आहेत.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जातेय काळजी
* बर्ड फ्लूच्या धर्तीवर ७३ सदस्यांचा एक नियंत्रक विभाग उभारला आहे.
* ९१ पशुधन विकास अधिकारी आणि १४२ पर्यवेक्षक हे व्यावसायिकांकडून दररोज आढावा घेतात.
* ग्रामपंचायत पातळीवर मार्गदर्शक सूचना लावल्या आहेत. आजाराची लक्षणे सांगितली असून, ती दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले, तसेच वनविभागाशीही संपर्क साधून सूचना केल्या आहेत.
मृत पक्षी आढळल्यास तात्काळ कळवा
‘बर्ड फ्लू’ हा सर्दीसारखा आजार आहे. कोंबड्यांना सर्दी होऊन त्यांचा श्वास गुदमरतो आणि त्या गतप्राण होतात. लसीकरण त्यावर उपाय आहे. असे पक्षी आढळल्यास जिल्हा पशुसंर्वधन विभागाशी अथवा तालुका पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
काही दिवसांपूर्वी उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये दौरा केला. येथे खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. अद्यापपर्यंत ‘बर्ड फ्लू’चे एकही प्रकरण पुढे आले नाही.
नवनाथ नराळे, पशुसंवर्धन अधिकारी