मेडिकल इमर्जन्सीसाठी सोय; पोलिसांना फोन लावा, रिक्षा हजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:53 PM2020-07-18T12:53:26+5:302020-07-18T12:56:44+5:30
प्रत्येक पोलिस ठाण्यात पाच रिक्षा; संचारबंदी काळातील शहर पोलिसांची व्यवस्था
सोलापूर : संचारबंदीच्या काळात मेडिकल इमर्जन्सी असेल तर संबंधित व्यक्तीला सेवा देण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच रिक्षा नियुक्त करण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला तत्काळ रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. १६ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपासून सोलापुरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाल्यासह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील नगरे,वस्त्या, झोपडपट्टी, सोसायटी आदी भागात राहणाºया लोकांना मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास त्यांना रिक्षाची सोय करुन देण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर प्रथमत: त्या व्यक्तीची अडचण जाणून घेतली जाणार आहे. मेडिकल किंवा हॉस्पिटल याची इमर्जन्सी असेल तर संबंधित व्यक्तीचा पत्ता, नाव घेऊन रिक्षाचालकाला पाठवले जाणार आहे. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी ही सुविधा देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काळातील अनुभव घेता सध्या सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून दहा रिक्षा नियुक्त करण्यात आल्या आहेत. या रिक्षा हद्दीतील नगर, सोसायटी व झोपडपट्टी असा भाग पाहून त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत असे, सदर बझारचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सांगितले.
या नंबरवर करा फोन...
फौजदार चावडी पोलीस ठाणे- ०२१७- २७४४६२१, जेलरोड पोलीस ठाणे-०२१७- २७४४६३१ सदर बझार पोलीस ठाणे-०२१७- २७४४६४१ विजापूर नाका पोलीस ठाणे- ०२१७- २७४४६५१, सलगर वस्ती पोलीस ठाणे-०२१७- २७४४६६१, एमआयडीसी पोलीस ठाणे-०२१७- २७४४६९०, जोडभावी पेठ पोलीस ठाणे-०२१७- २७४४६३४. असे सात पोलीस ठाण्याचे फोन नंबर आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मेडिकलची अडचण सांगितल्यास ती दूर केली जाणार आहे.