कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना मिळाला विठ्ठलाचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:37+5:302021-05-16T04:21:37+5:30
शुक्रवारी अक्षय तृतीयेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. यामुळे विठ्ठलाच्या गाभाऱ्याला आमराईचे ...
शुक्रवारी अक्षय तृतीयेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. यामुळे विठ्ठलाच्या गाभाऱ्याला आमराईचे रूप प्राप्त झाले आहे; परंतु त्यानंतर या आंब्यांचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील सर्व कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटल्समधील रुग्णांना तसेच रुग्णांवरती उपचार करणारे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना वाटप करण्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ठरवले. शनिवारी जनकल्याण हॉस्पिटल, लाइफलाइन हॉस्पिटल, गॅलॅक्सी हॉस्पिटल, श्री गणपती हॉस्पिटल, ॲपेक्स हॉस्पिटल, पावले हॉस्पिटल, श्री मेडिसिटी हॉस्पिटल, वरद विनायक हॉस्पिटल, श्री विठ्ठल हॉस्पिटल, ऑक्सिजन पोलीस हॉस्पिटल, पडळकर हॉस्पिटल, विठाई हॉस्पिटल, डीव्हीपी हॉस्पिटल, ६५ एकर (विठ्ठल रखुमाई) हॉस्पिटल, ६५ एकर नगर परिषद हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटल, जनकल्याण (वेदांत) हॉस्पिटल, डीव्हीपी (व्हिडिओकॉन) हॉस्पिटल, पल्स हॉस्पिटलमधील सर्व आरोग्य कर्मचारी व रुग्णांना आंबे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर शहरातील पालवी संस्था, बेघर निवारा, पत्रा शेड, घाट परिसर, बस स्टॅन्ड, कामगार वर्ग, झोपडपट्टी येथील लहान मुले व कुष्ठरोग वसाहतीमध्ये देखील आंब्यांचे वाटप करण्यात आले. यादरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाइजर व मास्क इत्यादींचा वापर करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
फोटो ::::::::::::::::::::
वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून आंब्यांचे वाटप करताना मंदिर समितीचे कर्मचारी.