जिथं भेट होईल तेथे मतदारांच्या भेटीगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:00+5:302021-01-10T04:17:00+5:30
निवडणुकीत हळूहळू चांगलाच रंग भरू लागला आहे. उरलेल्या चार दिवसात मतांची जुळवाजुळव व उमेदवारांना मतदारांनी केलेल्या डिमांडच्या ...
निवडणुकीत हळूहळू चांगलाच रंग भरू लागला आहे. उरलेल्या चार दिवसात मतांची जुळवाजुळव व उमेदवारांना मतदारांनी केलेल्या डिमांडच्या पूर्ततेवरच विजयाचे गणित मांडले जात आहे.
अनेक ग्रामपंचायतीसाठी अटीतटीची व प्रतिष्ठेची हायव्होल्टेज लढत होत आहे. अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही गावात चौरंगी लढती होत आहेत. मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने उमेदवाराची घालमेल वाढली आहे. थंडीत, पहाटेपर्यंत मतदारांचे उंबरठे झिजवू लागलेत. तर जिथं भेट होईल त्या ठिकाणी यंदा आपल्यावर लक्ष्य ठेवावं लागतय, अशी विनंती करुन पाया पडू लागले आहेत.
ग्रामीण भागात आघाडी, युती, पक्ष, पार्टीचे उत्साही कार्यकर्ते प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत मतदारांना आकर्षित करत आहेत. सोशल मीडियावर उत्साही कार्यकर्ते पॅनेलमध्ये उभे असलेल्या उमेदवारांच्या नावांसह त्यांचा भावी सरपंच अशा आशयाच्या पोस्ट प्रसारित करीत आहेत.
आणाभाका घेऊन मतांची गोळाबेरीज
ग्रामपंचायत निवडणूक पक्ष, पार्टीवर न होता गावातील हितसंबंध, नाती-गोती, मैत्री, एकमेकाच्या सुख-दुःखात कोण सहभागी झाले. अडचणीच्या वेळी कोण कोणाच्या मदतीला धावून आले, यावर होत असतात. असे असले तरी आजच्या काळात कोणीही मतदारराजावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे उमेदवार, नेतेमंडळी मतदारांना प्रलोभने दाखवून त्याच्याकडून काचोळी, भंडारा, गुलाल, देवाची काठी, अशा आणाभाका घेऊन मताची गोळाबेरीज करीत आहेत.