सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाबद्दल सारेच अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 04:37 PM2022-07-02T16:37:29+5:302022-07-02T16:37:35+5:30
धक्कातंत्राचा परिणाम : श्रीकांत देशमुखांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची गळाभेट
साेलापूर : भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा जाेरदार धक्का जिल्ह्यातील नेत्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी शुक्रवारी दुपारी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. आम्ही साेबत आहाेत, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
माढा लाेकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढाेबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रसाद कुलकर्णी आदींनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रशांतराव परिचारक यांच्याशी हितगूज केले. फडणवीस यांनी परिचारक यांच्या पाठीवर हात ठेवत स्मितहास्य केले. हा संवाद सुरू असताना आमदार देशमुख, आमदार राऊत, आमदार आवताडे शांतपणे पाहत हाेते. गंभीर हाेत चाललेले वातावरण फडणवीस यांनीच हलके करीत सर्वांना काम करण्याचा सल्ला दिला. या भेटीत आणखी काय चर्चा झाली, हे सांगण्यास आमदारांनी नकार दिला.
यादरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. देशमुख यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मिठीही मारली. याचे फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल झाले हाेते.
---
जिल्ह्यातील पक्ष संघटनेतही शांतता
भाजपातील नव्या घडामाेडींचा धक्का पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांना बसला आहे. भाजपच्या कार्यालयात शांतता आहे. साेलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आता ताे भाजपचा बालेकिल्ला झाला. राष्ट्रवादीतील काही नेते फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात आले. शरद पवार यांनी ज्या मतदारसंघातून नेतृत्व केले ताे माढा लाेकसभा मतदारसंघ फडणवीस यांच्यामुळे भाजपच्या ताब्यात आला, असे अनेक नेते आवर्जून सांगतात. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार, एक विधान परिषद सदस्य आहेत. एक अपक्ष आमदार भाजपमध्ये सक्रिय आहेत. या सर्वांसाठी देवेंद्र फडणवीस हेच नेते असल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडी सरकार संकटात आल्यानंतर जिल्ह्यातील भाजप नेते आनंदात हाेते. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री हाेतील. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी तेच येतील, असे हे नेते सांगत हाेते.
--
देशमुखांचे नाव चर्चेत
एकनाथ शिंदे गटाकडून आमदार तानाजी सावंत यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे सांगितले. भाजपकडून आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे; परंतु मंत्रिपदाची यादी दिल्लीतून येणार आहे. आता याबद्दल बाेलता येणार नाही, असे आमदारांनी सांगितले.