शिरापूर योजनेसाठी लावणार मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:55+5:302021-02-15T04:20:55+5:30
नान्नज येथील कार्यक्रमासाठी सकाळी हेलिकॉप्टरने शरद पवार यांचे आगमन झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्या गाडीतून ते दत्तात्रय ...
नान्नज येथील कार्यक्रमासाठी सकाळी हेलिकॉप्टरने शरद पवार यांचे आगमन झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्या गाडीतून ते दत्तात्रय काळे यांच्या द्राक्षबागेकडे निघाले . त्यांच्यासमवेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे , जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे , आमदार यशवंत माने आणि द्राक्ष बागायतदार दत्तात्रय काळे याच गाडीतून प्रवास करीत होते. दहा मिनिटाच्या प्रवासात पवारांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न समजावून घेतले.
आमदार यशवंत माने यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेची माहिती देताना ही योजना निधीअभावी अर्धवट स्थितीत आहे. त्यासाठी ९० कोटी निधीची आवश्यकता असून हा निधी वेळेत आणि तातडीने मिळाल्यास नानज परिसरातील शेती अधिक समृद्ध होईल. छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिरापूरच्या पाण्याचा लाभ मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावणार आहे . त्यामुळे ९० कोटी निधीची यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी खा शरद पवार यांच्याकडे केली . आमदार माने यांच्या मागणीची दखल घेत खा पवार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत लवकरच मंत्रालयात बैठक लावून शिरापूर योजनेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तशा सूचना संबंधिताला दिल्या .
याच प्रवासादरम्यान खा शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष शेती, त्यातील अडचणी आणि निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन यावर दत्तात्रय काळे यांच्याशी चर्चा केली . निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करण्यासाठी सोलापूर जिल्हा सक्षम असून इथले हवामान त्यासाठी पूरक आहे. मात्र द्राक्ष निर्यात करताना शेतकऱ्यांची अनेकदा फसवणूक होत आहे त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे पाठ फिरवल्याचे दत्तात्रय काळे यांनी निदर्शनास आणून दिले .या विषयावर तज्ञांशी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांशी चर्चा करून निश्चित मार्ग काढला जाईल असेही पवार यांनी सांगितले.