माढ्यातून उमेदवारी दाखल करण्यासाठी गावागावांत मराठा बांधवांच्या बैठका सुरू
By दिपक दुपारगुडे | Published: March 17, 2024 07:30 PM2024-03-17T19:30:36+5:302024-03-17T19:30:52+5:30
सांगोला तालुक्यातून सात जणांनी केली अर्ज भरण्याची तयारी
सोलापूर : एकीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना सांगोला तालुक्यात सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील ३६ गावात बैठकांचे सत्र सुरू झाले असून वाढेगाव व चोपडी गावातून माढा लोकसभेसाठी ७ मराठा बांधवांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे तर वाकी गावात बैठक झाली. मात्र अर्ज भरण्याचा निर्णय अद्याप झाला नाही.
लोकसभा निवडणुकीची शनिवारी आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.
अशावेळी सांगोला तालुक्यातील ३६ गावांतील सकल मराठा समाज बांधवांच्या बैठका सुरू आहेत. वाढेगाव गावातून चौघेजण अर्ज भरणार असून चोपडी गावातून तिघाजणांची अर्ज भरण्याची तयारी पूर्ण झाली आहे तर वाकी शिवणे गावात मराठा समाज बांधवांची बैठक झाली आहे. मात्र अर्ज भरण्यावर अद्याप निर्णय झाला नाही. ज्या त्या गावातून मराठा समाज आपापल्या परीने निधी गोळा करून लोकसभेसाठी उमेदवार उभे करणार आहेत. मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सनदशीर मार्गाने आपला लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.