वीजचोरांना महावितरणचा दणका; एक दिवसात सोलापुरात १२ लाखांची वीजचोरी उघड
By Appasaheb.patil | Published: July 10, 2024 06:19 PM2024-07-10T18:19:58+5:302024-07-10T18:20:07+5:30
नुकतीच वीजचोरीविरुद्ध एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली.
सोलापूर : महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी एक दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात २२३ ठिकाण सुमारे १२ लाख ५३ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून व थेट वीजचोरी झाल्याचे आढळून आले.
नुकतीच वीजचोरीविरुद्ध एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे सकाळी ९ वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहीमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या उद्देशासाठी वीजजोडणी घेतली त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरु असलेले २५६ प्रकार उघडकीस आले असून त्यांना कलम १२६ नुसार दंड, व्याजासह वीजबिल देण्यात आले आहेत. तसेच थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे प्रकार या मोहिमेत उघड झाले. त्यांना कलम १३५ नुसार वीजचोरीप्रकरणी दंड व वीजवापराचे बिल देण्यात आले आहेत.
भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. वीजचोरी व अनधिकृतपणे वीजवापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीजबिल देण्यात येत आहे. या बिलाचा ताबडतोब भरणा करावा अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच थेट वीजचोरी प्रकरणात दंडात्मक रकमेसह वीजचोरीच्या संपूर्ण बिलाची रक्कम भरली नसल्यास कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.