मेंबर, मतदार यादीतून माझे नाव गायब झालंय; लोकांचा सोलापुरातील भावी नगरसेवकांना फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 03:22 PM2022-06-24T15:22:12+5:302022-06-24T15:22:18+5:30
प्रारूप यादी पाहण्यास गर्दी : पहिल्या दिवशी एकच हरकत दाखल
साेलापूर : महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी झाली. ही यादी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली हाेती. मतदार यादीत नाव पाहून काही लाेक खूश झाले तर काहींनी थेट आपल्या माजी आणि भावी नगरसेवकांना फाेन करून मतदार यादीत नाव नसल्याची जाणीव करून दिली.
राज्य निवडणूक आयाेगाच्या निर्देेशानुसार पालिका प्रशासन निवडणुकीची तयारी करीत आहे. पालिकेच्या एकूण ३८ प्रभागातील मतदार यादी गुरुवारी जाहीर केली. ही यादी काैन्सिल हाॅलमध्ये पाहण्यास उपलब्ध आहे. निवडणूक कार्यालयाने १ ते ३८ याप्रमाणे प्रभागांची यादी ठेवली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी भेट देउन पाहणी केली. माजी नगरसेवक, नगरसेविका, नागरिक मतदार यादी पाहण्यास आले हाेते. पालिकेच्या एक ते आठ विभागीय कार्यालये आणि संकेतस्थळावरही यादी उपलब्ध आहे. पालिकेने शहर उत्तर, शहर मध्य आणि साेलापूर दक्षिण या मतदारसंघात येणाऱ्या प्रभागांच्या चतु:सीमांच्या आधारे मतदारांची नावे समाविष्ट केली आहेत.
---
निवडणूक कार्यालयास पहिल्याच दिवशी ५४ हजारांचे उत्पन्न
निवडणूक कार्यालयात प्रारूप मतदार यादी सीडी, पेन ड्राईव्ह आणि प्रिंट स्वरूपातही उपलब्ध आहे. एका प्रभागातील पेन ड्राईव्ह किंवा सीडीमध्ये हवी असेल तर १०० रुपये. प्रिंट स्वरूपात हवी असल्यास १५०० ते १७०० रुपये आणि एकूण ३८ प्रभागांची यादी प्रिंट स्वरूपात हवी असल्यास ४८ हजार ९३४ रुपये भरावे लागतील. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी १५ प्रभागातील यादी पेन ड्राईव्हमध्ये ३९ जणांनी प्रिंट स्वरूपात यादी घेतली. यातून निवडणूक कार्यालयात ५४ हजार १९८ रुपये जमा झाले, असे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.
-
अशी घेता येईल हरकत
पहिल्या दिवशी एका व्यक्तीने हरकत घेतली. आपला परिसर एका प्रभागात तर मतदार यादीतील नाव दुसऱ्याच प्रभागात आल्याचे या व्यक्तींचे म्हणणे आहे. सर्वच मतदारांनी प्रारूप यादी पाहावी. नाव नसेल तर मतदान ओळखपत्र, यापूर्वी मतदान केल्याची स्लीप आदी पुरावे सादर करावेत. निवडणूक कार्यालयात हरकत सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले.