सोलापूर ग्रामीण पोलीस साकारताहेत शहिदांचे स्मारक; कोंडी, हिरजला घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 03:02 PM2019-02-18T15:02:47+5:302019-02-18T15:04:49+5:30
सोलापूर : समाजातील सज्जनांचे रक्षण आणि खल प्रवृत्तीचा नायनाट करण्याचे ब्रीद घेऊन सेवा देणारे पोलीस आता सामाजिक कार्यातही आघाडीवर ...
सोलापूर : समाजातील सज्जनांचे रक्षण आणि खल प्रवृत्तीचा नायनाट करण्याचे ब्रीद घेऊन सेवा देणारे पोलीस आता सामाजिक कार्यातही आघाडीवर आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अशा कार्यात आपला ठसा उमटविला असून, स्वयंपूर्ण दत्तक खेडेगाव योजनेंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे शहिदांचे स्मारक ग्रामीण पोलीस साकारत आहेत.
वेल्फेअर विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम हे आपल्या सहकार्यांबरोबर या मोहिमेला मूर्त स्वरूप देत आहेत. त्यांच्या कार्यात गावातील पायाभूत सुविधांचा विकास व लोकसहभागातून सामाजिक विषयांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. यातून या गावातील मंदिरं व दर्गाहची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. गावात दररोज विविध विषयांवर बैठका घेऊन लोकांना गरजेच्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
कोंडी गावाचा विकास करीत असताना आत्तापर्यंत या गावातील तीन जवान शहीद झाल्याचे दिसून आले. यामध्ये हुतात्मा शिवराम गेनू निंबाळकर (सन: १९३९-४५), शहीद रघुनाथ विठोबा भालेकर (सन: १९६९), शहीद मधुकर सोपान भोसले (सन: १९९३) यांचा समावेश आहे. या शहिदांच्या प्रेरणेतून ग्रामस्थांना विकासाचा मार्ग दिसावा म्हणून स्मारक उभारण्याचे ठरले. १ डिसेंबर २०१७ रोजी भाभा अनुसंशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेने या कामाची दखल घेत स्मारकासाठी १२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
या निधीतून स्मारक व त्याभोवती बगीचा, ट्रॅक व इतर गोष्टी उभारण्यात येत आहेत. हे काम भाभा अनुसंशोधन केंद्राच्या आकृती या संस्थेमार्फत सुरू आहे. आता स्मारकाचे काम पूर्णत्वावर आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या ठिकाणी शहिदांचे स्मृतीशिल्प उभारण्यात येणार आहे.
पोलिसांची गरज का ?
गावात राजकारण व गट असतात. त्यामुळे विकासाला खीळ बसते. त्यामुळे ग्राम विकासाला पोलिसांनी मदत केली तर गावात बदल होऊ शकतो असा विचार करून दहा वर्षांपासून ग्रामविकासात काम करीत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम यांनी सांगितले.