चाहत्यांनी जागविल्या आठवणी; साेलापूरकरांच्या प्रेमाने भारावले हाेते दिलीपकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:59 PM2021-07-08T16:59:29+5:302021-07-08T16:59:38+5:30
काेहिनूरचा राैप्यमहाेत्सव, गर्ल्स स्कूलच्या निधी संकलनासाठी केली मदत
साेलापूर - भारतीय सिनेमाचा काेहिनूर दिलीपकुमार यांचे बुधवारी निधन झाले. शहरात दिलीपकुमार यांचा माेठा चाहता वर्ग आहे. या चाहत्यांसाठी ते १९६० मध्ये साेलापुरात आले हाेते. सिनेमागृहांचे मालक भागवत कुटुंबीयांसह चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले हाेते. चाहत्यांच्या प्रेमाने दिलीपकुमारही भारावल्याचे भागवत कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
भागवत कुटुंबातील अजय भागवत यांंनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून या भेटीच्या आठवणी अनेकदा ऐकल्या आहेत. या आठवणी त्यांनी ‘लाेकमत’ला सांगितल्या. काेहिनूर सिनेमाने भागवत चित्रमंदिरात २५ आठवडे पूर्ण केले हाेते. यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यासाठी दिलीपकुमार, निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चाेप्रा, अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासह सिनेमाची टीम साेलापुरात आली हाेती. भागवत चित्रपटगृहांचे जनक शंकरराव भागवत यांच्यासह त्यांचे पुत्र उमाकांत भागवत, शशिकांत भागवत, अनिल भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. समाेरच्या हाॅॅटेलमध्येच सिनेमाच्या टीमचा मुक्काम हाेता.
प्रिंटची हत्तीवरून मिरवणूक
दिलीपकुमार यांच्या चाहत्यांनी ‘मुघल-ए-आझम’ सिनेमाच्या प्रिंटची हत्तीवरून वाजत-गाजत मिरवणूक काढली हाेती. या सिनेमाच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शाे’ची तिकिटे मिळविण्यासाठी चाहते आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून भागवत चित्रपटगृहाबाहेर ठाण मांडून हाेते. पहाटे पाेलीस बंदाेबस्तही लावला हाेता.
असा कलाकार पुन्हा हाेणे नाही
नगरसेवक रियाज खरादी हे सुद्धा दिलीपकुमार यांचे चाहते. खरादी म्हणाले, उमरगा येथे १९८५ साली एका काॅलेजच्या उद्घाटनासाठी दिलीपकुमार आले हाेते. त्यांना पाहण्यासाठी माझ्यासह साेलापुरातील शेकडाे तरुण मिळेल त्या वाहनाने उमरग्याला पाेहाेचलाे हाेताे. काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे संस्था चालकांविरुद्ध आंदाेलन सुरू हाेते. दिलीपकुमार यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. त्यामुळे कार्यक्रम झालाच नाही, मात्र दिलीपकुमार विश्रामगृहात थांबले हाेते. या विश्रामगृहाचे प्रमुख आमचे नातेवाईक असल्याने आम्हाला दिलीपकुमार यांना भेटण्याची संधी दिली. असा कलाकार पुन्हा हाेणे नाही.
साेलापूरच्या कारीगर कुटुंबीयांशी नातं
बेगम कमरुनिस्सा गर्ल्स स्कूलच्या स्थापनेसाठी साेलापूरच्या कारीगार कुटुंबीयांनी निधी संकलनाचा निर्णय घेतला. यासाठी १९७० मध्ये दिलीपकुमार साेलापुरात आले हाेते. या संस्थेच्या सचिव रेहमा महंमद हनिफ कारीगर यांनीही दिलीपकुमार यांच्या आठवणी जागविल्या. रेहमा म्हणाल्या, आमच्या मावशीच्या छाेट्या मुलाचे दिलीपकुमार यांच्या सर्वांत लहान बहिणीशी लग्न झाले हाेते. त्यामुळे दिलीपकुमार आणि आमच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध हाेते. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीमुळेच दिलीपकुमार, महेंद्र कपूर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी निधी संकलन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आली हाेती. मुलींसाठी शाळा सुरू करणे खूप ‘नेक’ काम असल्याचे गाैरवाेद्गार त्यांनी काढले हाेते.