आठवण; सोलापूर महापालिकेने लतादीदींना मानपत्र देऊन केला होता सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 01:52 PM2022-02-06T13:52:06+5:302022-02-06T13:52:45+5:30
लतादीदींनी पहिले गाणे गायिले होते सोलापुरात
राजकुमार सारोळे
सोलापूर: गानसम्राज्ञी लतादीदींना सोलापूर महापालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान केला होता. लतादीदींना मानपत्र देणारी सोलापूर महापालिका ही राज्यातील पहिली होय अशी आठवण माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सांगितली.
गानसम्राज्ञी लता दीदींनी आपल्या गायनाची सुरुवात सोलापुरातून केली होती. सोलापुरातील सरस्वती चौकातील एका कार्यक्रमात वडील दिनानाथ मंगेशकर यांच्यासोबत त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी पहिले गाणं गायिले. याला श्रोत्यांनी भरपूर दाद दिल्यावर त्यांना खूप आनंद झाला. या आनंदाच्या भरात त्यांनी थिएटरसमोर असलेल्या हौदात उडी मारली. सोलापुरातील एका छायाचित्रकाराने हा आनंद टिपला होता. पुढे त्या जगप्रसिद्ध झाल्या. सोलापुरातील त्यांची आठवण म्हणून महापालिकेने त्यांना मानपत्र देण्याचा ठराव केला. मानपत्र स्वीकारण्यास त्यांनी सोलापुरात यावं म्हणून महापौर सपाटे हे इतर नगरसेवकांबरोबर एकूण 69 वेळा त्यांच्या घरी गेले पण कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्यांनी भेट दिली नव्हती.
माजी आमदार युन्नुसभाई शेख यांचे वडील जैनुद्दीन शेख यांनी लतादीदींचा तो पहिला फोटो सपाटे यांच्या हवाली केला आणि सांगितलं, हा फोटो घेऊन जावा लतादीदी सोलापूरला येतील. त्याप्रमाणे सपाटे लतादीदींच्या घरी गेले. उषादीदींनी सोलापूरचे लोक आले आहेत म्हटल्यावर लतादीदी संतापल्या होत्या. कशासाठी मी सोलापूरला जाऊ? असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी सपाटे यांनी त्यांना सोलापुरातील हा फोटो दाखवला. त्यांना आनंद झाला व त्यांनी सोलापूरला यायचं मान्य केलं. 15 फेब्रुवारी 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते महापालिकेने मानपत्र प्रदान केले. यावेळी दीड लाख लोकांचा समुदाय पार्क मैदानावर जमला होता. पवार यांच्या आग्रहास्तव त्यांनी स्टेजवर "मोगरा फुलला' हे गाणंही गायलं होतं. त्यानंतर मुक्काम वाढवून त्यांनी तुळजापूरची अंबाबाई, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शनही घेतलं होतं