पुरुष म्हणतात.. नको मर्दा, कुटुंब नियोजन महिलांवरच; पुरुषांचा शस्त्रक्रियेला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 06:19 PM2022-03-25T18:19:33+5:302022-03-25T18:19:42+5:30
मर्दानी जाण्याची भीती: पुरुषांचा शस्त्रक्रियेला नकार
सोलापूर : ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ असा संदेश देत आरोग्य विभागाचे कर्मचारी कुटुंब कल्याणचा कार्यक्रम राबविण्यासाठी घरोघरी जाताहेत. यासाठी पुरुष नसबंदी अधिक सुरक्षित व सोपी असल्याचे सांगूनही केवळ मर्दानी जाण्याच्या भीतीने पुरुष मंडळी कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर ढकलत असल्याचे चित्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.
आरोग्य विभागातर्फे लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविला जात आहे. एक किंवा दोन मुलांवर शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन करावे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जातो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागातर्फे लाभार्थ्यांस ९०० ते १३०० रुपये अनुदानही दिले जाते. महिलांसाठी टाक्याची व बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेची सोय आहे, तर पुरुषांसाठी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते; पण नसबंदीबाबत पुरुषांमध्ये बरेच गैरसमज आहेत. नसबंदी केल्याने मर्दानी जाण्याच्या भीतीने पुरुष मंडळी शस्त्रक्रियेला तयार होत नाहीत, असा आरोग्य कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. तरीही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आराेग्य कर्मचारी नसबंदीचे महत्त्व पटवून सांगताना दिसून येतात.
महिलांवरच जबाबदारी
जिल्ह्यात कुटुंब नियोजन करण्याचे महिलांचे प्रमाण ९९.७ टक्के इतके आहे. केवळ बोटावर मोजण्याइतपत पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे १३ हजार ५५ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. यात नोव्हेंबरअखेर ५ हजार ९८५ शस्त्रक्रिया झाल्या. कोरोना महामारीमुळे शस्त्रक्रिया कमी झाल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी सांगितले.
पुरुषाचे प्रमाण ०.३ टक्के
पुरुष नसबंदीचे प्रमाण केवळ ०.३ टक्के इतके आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील केवळ तिघांनी शस्त्रक्रिया केल्या. विशेष धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्याला १ हजार ६७१ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; पण पुरुषांची मानसिकता तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. कुटुंब नियोजनाचा भार महिलांवर सोडला जात आहे.
कोरोनामुळे घटल्या शस्त्रक्रिया
- जिल्ह्यातील ५ हजार ९८५ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या. यात ५ हजार ९८२ महिला आहेत. यात एक व दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची संख्या ४ हजार ३९ इतकी आहे.
- जिल्ह्याला १३ हजार ५५ महिला, तर १ हजार ६७१ पुरुष अशा २० हजार ८५ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यापैकी केवळ ५ हजार ९८५ इतक्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. कोरोनामुळे शस्त्रक्रिया घटल्याचे दिसून येत आहे.
यासाठी घाबरतात पुरुष
पुरुषांना मर्दानी जाण्याची भीती वाटते. घरातील महत्त्वाची कामे पुरुषाला पार पाडावी लागतात. यात ओझे उचलणे, धावपळ करणे, अंगावरील कामे करावी लागतात. नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यास ही कामे करता येणार नाहीत. कुटुंबाचा खर्च कसा करणार? महिलेने शस्त्रक्रिया केली तर तिला आराम करण्यास परवानगी दिली जाते.
---------
पुरुषांनी नसबंदी केली तर ताकद जाते, अशा अफवा पसरविल्या गेल्या आहेत. कित्येक वर्षांपासून कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर लादली गेली आहे. यासाठी महिला त्रास सहन करतात. खरेतर पुरुष नसबंदी एकदम सोपी व कमी त्रासाची आहे.
- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी