उस्मानाबादमध्ये पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २० नोव्हेंबरपासून

By Appasaheb.patil | Published: November 12, 2022 01:57 PM2022-11-12T13:57:44+5:302022-11-12T13:58:01+5:30

पुरुष व महिला गटाची ५५वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा उस्मानाबाद येथे २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान होत असल्याची माहिती भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Men's and Women's Group National Championship Kho Kho Tournament from November 20 in Osmanabad | उस्मानाबादमध्ये पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २० नोव्हेंबरपासून

उस्मानाबादमध्ये पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २० नोव्हेंबरपासून

googlenewsNext

सोलापूर :  पुरुष व महिला गटाची ५५वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा उस्मानाबाद येथे २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान होत असल्याची माहिती भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व क्रीडा प्रकारातील  प्रथमच आयोजित केली जाणारी ही राष्ट्रीय स्पर्धा आहे असे सांगून या स्पर्धेसंबंधी अधिक माहिती सांगताना डॉ. जाधव म्हणाले, "भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा उस्मानाबाद येथील  तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात होत आहे. या स्पर्धेसाठी पाच मैदाने तयार करण्यात येत असून तीन मातीची व दोन मॅटची असणार आहेत. चार मैदानावर विद्युतझोताची सोय करण्यात आली असून इनडोअर हॉलमधील एका मैदानावरही हे सामने प्रकाशझोतात होतील.

या स्पर्धेत प्रेक्षकांना ताजा गुणफलक  पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्ड लावण्यात येत आहे. स्पर्धेसाठी भव्य असे प्रवेशद्वार करण्यात येणार असून प्रेक्षकांना सामने पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी पंधरा हजार प्रेक्षक क्षमता असलेली भव्य अशी गॅलरी उभारण्यात येत आहे. या गॅलरीला शाहूराज खोगरे, अशोक उंबरे, भुजंगराव देशमुख, बुवासाहेब बागल, सुबराव बोधले, शहाजी मुंडे, बबनराव लोकरे, रावसाहेब डोके या ज्येष्ठ खो खो खेळाडू व क्रीडा संघटक यांची नावे दिली जाणार आहेत. या स्पर्धेनिमित्त उस्मानाबादचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खो खो संघटक शाहूराज खोगरे यांचा उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनच्या वतीने भव्य सत्कार सोहळा २३नोव्हेंबर रोजी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व माजी खो-खो खेळाडूंचा सोलापुरी चादर व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खोचरे, आयोजन समितीचे सदस्य रेहमान काझी आदी उपस्थित होते.

खेळाडूंची निवास व्यवस्था हॉटेलमध्ये

या स्पर्धेत  खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, अधिकारी व पदाधिकारी असे दोन हजारजण सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे खेळाडू हा केंद्रबिंदू असलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांची निवास व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

महाराष्ट्रास रेल्वे व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे आव्हान

या स्पर्धेत यजमान महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूरसह देशातील सर्व राज्ये भाग घेणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय रेल्वेसह, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, पोलीस, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे व्यवसायिक संघही भाग घेत आहेत. भारतीय रेल्वे महाराष्ट्राच्या पुरुष संघास गेल्या दोन वर्षापासून हुलकावणी देत आहे. महिला संघाने गतवर्षी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या संघाकडून विजेतेपद खेचून आणले होते.

Web Title: Men's and Women's Group National Championship Kho Kho Tournament from November 20 in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.