सोलापूरचा पारा ४४.३ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:18 PM2019-05-21T12:18:32+5:302019-05-21T12:19:53+5:30
धगधगत्या उन्हातही सोलापूरकरांनी समर्थपणे तोंड देत उन्हापासून बचाव करत आपली दैनंदिन कामे सुरु ठेवल्याचे चित्र दिसून आले.
सोलापूर: उगवणारा प्रत्येक दिवस उन्हाचा तडाखा घेऊन येत आहे. रविवारच्या ४३.८ अंश सेल्सिअसवरुन पाºयाने ०.५ ने उडी घेत सोमवारी ४४.३ अंश तापमान येथील हवामान खात्याच्या प्रयोगशाळेत नोंदले गेले. गेल्या २५ दिवसांत तीन वेळा ४४.३ अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे. धगधगत्या उन्हातही सोलापूरकरांनी समर्थपणे तोंड देत उन्हापासून बचाव करत आपली दैनंदिन कामे सुरु ठेवल्याचे चित्र दिसून आले.
रखरखीत उन्हाची तीव्रता सोलापूरकरांना नवीन नाही. येथे मार्च महिना उजाडताच पारा चाळीशी पार करु लागतो. रविवारप्रमाणेच सोमवारीही सकाळी ८ पासूनच सूर्याने आपले रौद्र रुप धारण केले. उष्म्याची ही धग दुपारी १२ नंतर अधिक जाणवायला सुरुवात झाली. दुचाकीवरुन जाताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल, स्कॉर्प वापर करुनही डोके आणि कानशीलास तप्त उन्हाच्या झळा बसू लागल्याचे आबालवृद्धांनी बोलताना सांगितले.
घरांमधील पंख्यांची हवाही उष्ण येऊ लागल्याने लहान मुले आणि वृद्ध मंडळी, दमा, अस्थमा आजाराने त्रस्त रुग्णांना गेल्या महिन्यापासून एप्रिल आणि मे हीटचा सामना करावा लागत असल्याचे अनेकांनी सांगितले. गेल्या महिन्यातील २६ आणि २८ एप्रिल रोजी ४४.३ अं़ से. तापमान नोंदले होते. आज (सोमवारी) पुन्हा पारा ४४.३ अंशांवर पोहोचला. ही स्थिती पाहता यंदा २० मे २००५ रोजी नोंदल्या गेलेल्या १५ वर्षांतील ४५.१ अं. से. उच्चांकी तापमानाचा विक्रम मोडला जातो की काय, अशीही चर्चा शहरभर ऐकायला मिळाली.