दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:51 PM2020-05-10T20:51:08+5:302020-05-10T20:51:29+5:30
आपण संतांच्या, सदगुरुंच्या वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा.
दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती असुन तोच देह देवाचे साक्षात घरच आहे आणि देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा किंवा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश करीत आहेत. एवढेच नाही तर निंदा, द्वेष, चेष्टा ज्या अभिमानाच्या संगतीने घडतात त्या अभिमाला भाजा म्हणजे जाळून टाका मग अभिमान गेला तुका म्हणे देव झाला अशी अवस्था प्राप्त होईल. या करीता अभिमान सांडून किंवा सोडुन केशवाला भजा म्हणजे भगवंताचे अखंड प्रेमपुर्वक नामस्मरण, भजन करा. असा उपदेश करीत आहेत.
शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आम्ही ( या निवृत्तीने ) सुद्धा सदगुरू कृपेने अभिमान रहित होऊन एकरुप चित्ताने भगवंताचे भजन केले आहे म्हणून अवघ्याच गुणदोषांना गिळून टाकले आहे म्हणजे गुणदोषांच्या पलिकडे असलेल्या किंवा दोषरहीत, गुणातीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपलेसे करुन अवीट आनंदाचा उपभोग घेत आहोत. आणि आपण इतरांनी सुद्धा याच ( संतांच्या, सदगुरुंच्या ) वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा.
- ह.भ.प. वसंत साठे महाराज,
बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर