सोलापुरातील सिंहगड क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणावरून गोंधळ; रूग्ण अन् कर्मचाऱ्यात बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:53 PM2021-03-27T13:53:20+5:302021-03-27T13:53:28+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : सिंहगड क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा, सुविधा यावरून शुक्रवारी गोंधळ झाला. महापालिकेचे कर्मचारी आणि रुग्णांमध्ये बाचाबाची झाली. सिंहगड क्वारंटाइनमध्ये ५०० हून अधिक लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सहामजली इमारतीमध्ये अनेक नागरिकांना वेळेवर जेवण, पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी दुपारी जेवण उशिरा आले. उशिरा आलेल्या जेवणाच्या दर्जावरून गोंधळ सुरू झाला. नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि जेवण घेऊन आलेल्या मक्तेदारांच्या माणसांना धारेवर धरले. आम्हाला इथे मरणासाठी आणले आहे का? चांगले जेवण नाही, वेळेवर पाणी मिळत नाही. कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, अशी ओरड करायला सुरुवात केली. एकाच ठिकाणी १०० हून अधिक लोक थांबले होते. त्यामुळे पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली होती.
वाढता गोंधळ पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी घटनास्थळी भेट दिली. आज, शनिवारपासून वेळेवर जेवण येईल, असे सांगितले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी मक्तेदार बदलण्याचे आदेश दिले.
अधिकाऱ्यांना सवाल : तुम्ही तरी असे जेवण करणार का?
महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी पाहणीसाठी आले तेव्हा नागरिक आणखी संतापले. ‘तुम्ही तरी असे जेवण करणार का? आम्हाला घरी जाऊ द्या,’ अशी मागणी नगारिक करीत होते.