coronavirus; युरोप अन् आखातातील व्यापाºयांचा मेसेज; ‘नो मनी...नो ऑर्डर...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:03 PM2020-03-21T12:03:29+5:302020-03-21T12:08:32+5:30
कोरोनाच्या दहशतीखाली टेक्स्टाईल उद्योग; ५० टक्के निर्यात ठप्प; शंभर कोटींहून अधिक पेमेंट थकले
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : कोरोनाचा फटका सोलापुरातील सर्व उद्योगांना बसतोय़ कोरोनाच्या दहशतीखाली येथील टेक्स्टाईल उद्योग सापडला आहे़ आखाती आणि युरोप देशात लॉकडाऊन सुरू झाल्याने तब्बल ५० टक्क्यांहून अधिक निर्यात ठप्प झाली आहे़ लोकल मार्केटमध्येही सोलापुरी टेरी टॉवेलची मागणी घटली आहे़ निर्यातदार देशांनी ऑर्डर दिलेला माल स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे, तर ऑर्डर मालाची बिलेही देता येणार नसल्याचे कारण सांगत कोरोनाचा दहशत संपुष्टात आल्यानंतर पुढचा व्यवहार पाहू, असे विदेशी व्यापाºयांकडून सांगण्यात येत आहे़ नो ऑर्डर नो मनीची भूमिका विदेशी व्यापाºयांनी स्वीकारली आहे़ त्यामुळे, येथील कारखान्यांवर शटडाऊन करण्याचा बाका प्रसंग उद्भवतोय की काय, अशी भीती उद्योजकांसमोर पसरली आहे.
सोलापुरी टेक्स्टाईलचा उद्योग मोठा आहे़ प्रतिवर्षी आठशे ते हजार कोटींची टेक्स्टाईल उत्पादने निर्यात होतात. तसेच देशांतर्गत मार्केटमध्येही सोलापुरी टेरी टॉवेलचा मोठा दबदबा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरी टेरी टॉवेलची मागणी निम्म्याहून कमी झाली आहे़ मागील पंधरा दिवसांत निर्यात ५० टक्के कमी झाली आहे. विशेष म्हणजे, नवीन आॅर्डर पुढील दोन महिने मिळणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.
सोलापूर टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसकी सांगतात, इराण, इराक, सौदी, अबुधाबी, दुबई यांसारख्या आखाती देशांत तसेच जर्मन, स्पेन, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियम यांसारख्या युरोप देशात लॉकडाऊन सुरू झाल्याने याचा सर्वाधिक फटका येथील टेक्स्टाईल उद्योगाला बसला आहे. आखाती आणि युरोपीय देशांकडून सोलापुरी टेरी टॉवेल्सना मोठी मागणी आहे़ विदेशी व्यापारी आम्हाला साफ सांगतायत की तयार माल पाठवू नका आणि नवीन ऑर्डरची अपेक्षा पुढील काही दिवसांकरिता करू नका़ मागील निर्यात मालाचे पेमेंट द्या, अशी मागणी केली असता आता पेमेंट पाठवता येणार नाही. विदेशातील उलाढाल पूर्णपणे ठप्प झाल्याचे कारण त्यांच्याकडून दिले जात आहे़ त्यामुळे आमची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
पगारी रजा देण्याची मागणी...
- विदेशातून तसेच स्वदेशातून नवीन आॅर्डर येईनात़ सध्या सर्वच कारखान्यात माल स्टॉक आहे़ नवीन उत्पादन घेणे रिस्क आहे़ अशा काळात उत्पादन क्षमता कमी करणे हा एकमेव उपाय उत्पादकांसमोर आहे़ तसेच चार ते पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार उद्योजक करतायत़ याचा थेट फटका कामगारांना बसू शकतो़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कारखाने बंद ठेवून कामगारांना पगारी रजा द्या, अशी मागणी कामगार संघटनांमधून जोर धरत आहे़ संघटनांची मागणी उद्योजक कदापि स्वीकारणार नाहीत़ उत्पादन क्षमता कमी झाल्यास कामगारांची रोजी-रोटी निम्म्यावर येऊ शकते़