रे नगरमधील ३० हजार गृहप्रकल्पाची म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
By Appasaheb.patil | Published: August 18, 2023 07:09 PM2023-08-18T19:09:09+5:302023-08-18T19:09:18+5:30
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाच्या माध्यमातून ३० हजार बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर ...
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाच्या माध्यमातून ३० हजार बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकल्पातील १५ हजार घरांचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सुचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, माजी आमदार नरसय्या आडम, रे नगर सोसायटीच्या चेअरमन नलिनताई कलबुर्गी, नगरसेविका कामिनीताई आडम, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे यांच्यासह म्हाडाचे अन्य अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
३० हजार बेघरांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर देण्याचा हा रे नगरचा प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात पंधरा हजार लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व संबंधित विभागाने या पहिल्या टप्प्याची कामे विहित वेळेपूर्वी पूर्ण करून देण्यासाठी अधिक गतीने काम करावे. तसेच या प्रकल्पात केंद्र व राज्य शासन यांच्या वतीने रस्ते, वीज, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था आदि सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शासन व प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात असून, येथे वास्तव्यास येणाऱ्या सर्व नागरिकांनी या परिसरातील स्वच्छता चांगली ठेवावी असे आवाहन करून हा गृह प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृहप्रकल्प असेल याची खात्री म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.