भीतीपोटी पंढरपुरातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:23 PM2018-12-29T12:23:38+5:302018-12-29T12:25:20+5:30
पटवर्धन कुरोली : बिबट्यासदृश प्राण्याने बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या पालावर हल्ला करीत चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतला़ त्यानंतर घाबरलेल्या २२ ...
पटवर्धन कुरोली : बिबट्यासदृश प्राण्याने बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या पालावर हल्ला करीत चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतला़ त्यानंतर घाबरलेल्या २२ जणांच्या ऊसतोडणी कामगारांच्या टोळीने भीतीने गुरुवारी पटवर्धन कुरोली येथून स्थलांतर केले़ दरम्यान, शुक्रवारी पुन्हा सकाळी देवडे रस्ता जवळेकर वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले़ वन विभागाच्या वतीने पुन्हा ठसे शोधण्याची मोहीम सुरू केली असली तरी प्रत्यक्षात बिबट्या की अन्य प्राणी याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
पटवर्धन कुरोली येथे बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांच्या पालावर बिबट्याने हल्ला चढवित एका मुलीचा जीव घेतला़ हे ऊसतोडणी कामगार पटवर्धन कुरोली येथे रामकृष्ण नाईकनवरे यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी आले होते़ मात्र अचानक बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या टोळीतील २२ कामगार अजूनही सावरले नाहीत़ दुसरा दिवस त्यांनी चिंताग्रस्त मन:स्थितीत काढला़ गुरुवारी सायंकाळी त्यांनी पुन्हा असाच प्रकार घडू नये, म्हणून पटवर्धन कुरोली येथून तो अर्धवट उसाचा फड सोडून स्थलांतर केले़ पटवर्धन कुरोलीत गेल्या १५ दिवसांपासून अधून-मधून काही शेतकºयांना बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन होत आहे़ मात्र वन विभाग तो प्राणी बिबट्याच असल्याचे मान्य करायला तयार नाही़ सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू आहे.
भीमा नदीकाठच्या परिसरात सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे़ शिवाय नदीकाठच्या परिसरात झाडे, झुडपे, ओढे असल्याने बिबट्यासदृश प्राणी या परिसरात वास्तव्य करीत जनावरांवर हल्ला करत आहे़ ऊसतोडणी कामगारही जिथे जागा मिळेल तेथे किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय होईल त्या ठिकाणी पाल ठोकून मुक्काम करतात. मात्र बुधवारी पालावर झालेल्या हल्ल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी ओढे, नदीकाठच्या परिसरात मुक्काम न करता लोकवस्तीच्या परिसरात राहावे, असे आवाहन विठ्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे यांनी केले.
पालावर मुले सांभाळण्यासाठी व्यक्ती
- बिबट्यासदृश प्राण्याचा पटवर्धन कुरोली परिसरात वावर असल्याची चर्चा होती़ आता तर तो प्राणी वस्त्यावर हल्ले करू लागला आहे़ हे समजताच पटवर्धन कुरोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ गावातील काही जणांच्या दोन-तीन किमी अंतरावर वस्त्या आहेत़ त्या वस्त्यांवरही शेतकरी शेतात कामाला जातात़ घरी लहान मुले असतात़ ऊसतोडणी कामगारांचे असेच असते़ बुधवारी झालेल्या प्रकारानंतर शेतातील वस्त्यांवर, ऊस तोडणीच्या पालावर खास लहान मुले सांभाळण्यासाठी एक-दोन व्यक्ती आवर्जून थांबू लागल्याचे दिसून येते़