दूध व्यवसाय येतोय पूर्वपदावर; खासगी संघांकडून गोची करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:23 PM2020-11-07T12:23:34+5:302020-11-07T12:25:05+5:30
सातत्याने बदलणारा दूध खरेदी दर शेतकऱ्यांना अडचणीचा
सोलापूर: कोरोना महामारी काळात अडचणीत आलेला दूध व्यवसाय सावरु लागला असताना खासगी दूध संस्थांनी संघटितपणे दूध खरेदी दर कमी करण्याचा प्रयत्न करून उत्पादकांची गोची केली जात आहे. सातत्याने बदलणाऱ्या दरामुळे दूध उत्पादक अडचणीत असताना शासन मात्र यावर गप्प आहे.
दूध उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील दूध उत्पादक सतत बदलणाऱ्या दरामुळे अडचणीत आलेत. कोरोनाच्या अगोदर मार्च महिन्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपयांवर गेला होता. मार्च महिन्याच्या अखेरला कोरोनामुळे लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे दूध विक्रीला मोठा फटका बसला. हाॅटेल व्यवसाय बंद झाले व घरगुतीसाठीही दूध पुरवठा करणे अडचणीचे ठरले. ऐन लग्नसराई व उन्हाळ्यात दूध उत्पादकांवर कोरोनामुळे संक्रांत आली. सप्टेंबरपासून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने दुधाला मागणीही वाढली आहे.
त्यामुळे १७- १८ रुपयांवर आलेला दूध खरेदी दर सावरु लागला. शासनाने सहकारी दूध संघांचे काहीअंशी दूध खरेदी सुरू केली; मात्र अनेक सहकारी संघ व खासगी दूध संघांना अनुदान योजनेचा फायदा मिळाला नाही. कोरोनामुळे १८ रुपयांवर आलेला गाईच्या दुधाचा खरेदी दर सावरत सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात २५ रुपयांवर गेला होता. दर चांगला मिळू लागताच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच खासगी दूध संघांनी एकत्रित येत दूध खरेदी दर प्रतिलिटर २२ रुपये इतका करण्याचा प्रयत्न केला.
खासगी संघांनी २१ ऑक्टोबरपासून गाईचे दूध २२ रुपयाने खरेदी करण्याबाबतचे दरपत्रक काढले असले तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी कोरोनामुळे फारच खाली आलेला दर चांगलाच सावरला आहे. सातत्याने दूध खरेदी दर बदलत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
राज्यात दररोज एक कोटी ६० लाख लिटर दूध संकलन
- - पुणे विभागात २१ सहकारी व खासगी लहान- मोठे २६० ब्रॅँड दूध संकलन करतात.
- - राज्यात साधारण ४० सहकारी संघ तर पुणे विभागात २१ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. राज्यातही २६० खासगी दूध ब्रॅँड आहेत.
राज्यात खासगी संघ गाईचे दूध २३, २४ व २५ रुपयाने खरेदी करीत आहेत. दूध दर चांगला सावरला आहे. पुणे विभागातच राज्याच्या तुलनेत ८० टक्के दूध संकलन होत आहे.
- प्रकाश कुतवळ, ऊर्जा दूध, पुणे