दूध, उन्हात खेळू न दिल्याने मुलांत कॅल्शियमची कमतरता; मुलांना होतोय हृदयाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 10:56 AM2021-12-10T10:56:58+5:302021-12-10T10:57:06+5:30
आराेग्य तपासणी : ६० मध्ये आठ मुले आढळली बाधित
सोलापूर : कुपोषित मुलांचे प्रमाण तपासण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने उत्तर तालुक्यात केलेल्या आरोग्य तपासणीत ६० पैकी आठ मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व क्षयरोग विभागामार्फत ही तपासणी करण्यात आली. यात उत्तर सोलापूर महिला बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात कमी वजनाचे आढळलेल्या ६० मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात या मुलांना टीबी किंवा इतर दुर्धर आजाराची बाधा झाली आहे काय यासाठी महापालिकेच्या मदत तेरेसा पॉलीक्लिनिकमध्ये एक्स-रे, चेस्ट, सीबीसी व टीबी चाचणी करण्यात आली. यासाठी क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. कुलकर्णी, डॉ. मंजिरी कुलकर्णी व बालरोगतज्ज्ञ डॉ. चाफळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोरपडे व तालुका वैद्यकीय अधकारी डॉ. शेगार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भगवान भुसारी यांनी परिश्रम घेतले.
कॅल्शियम कमी आढळले
सहा मुलांमध्ये कॅल्शियम कमी प्रमाणात आढळले. कोरोना काळात या मुलांना दूध मिळाले नाही व सकाळच्या कोवळ्या उन्हात न फिरल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले. कॅल्शियमचा कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना गोळ्या देण्यात आल्या व मातांना मुलांच्या आरोग्यासाठी कोणता आहार आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली.
सहा मुलांना हृदयाचा त्रास
सहा मुलांना हृदयाचा त्रास असल्याचे तपासणीत आढळले आहे. या मुलांची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे दीड वर्षे अंगणवाड्या बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांमध्ये कुपोषीतचे प्रमाण राहू नये यासाठी तालुकावर मोहीम हाती घेण्यात आली आहे.