दरवाढीसाठी साेलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ओतले दूध; शेतकऱ्यांचे आंदोलन
By राकेश कदम | Published: May 31, 2023 01:13 PM2023-05-31T13:13:00+5:302023-05-31T13:13:31+5:30
भाजप-शिंदे सरकारने लक्ष घालावे, आंदाेलकांची मागणी
साेलापूर : खासगी आणि सहकारी दूध संघाच्या दूध दर कपातीच्या निषेधार्थ काेंडी ता. उत्तर साेलापूर येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साेलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दूध सांडून आंदाेलन केले. राज्य सरकारने दूध संघांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
खासगी आणि सहकारी दूध संघांनी दूर खरेदी दरात २ ते ३ रुपयांची कपात केली आहे. काेंडी येथील दूध उत्पादक शेतकरी पांडुरंग जाधव, अमाेल साठे, प्रफुल्ल कदम, दीपक कदम, तुकाराम ननवरे यांच्यासह अनेक शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर जमले. तीन कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून निदर्शने केली. पांडुरंग जाधव म्हणाले, खासगी आणि सहकारी संस्थांनी संगनमताने दुधाचे दर कमी केले आहेत. ही शेतकऱ्यांची लूट आहे. दुध विक्रीचे आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. पशुखाद्याची दरवाढ हाेत आहे. केवळ दूध खरेदी दर कमी करुन लूट सुरू आहे. भाजप आणि शिंदे सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.