दुधदरवाढ आंदोलन पेटले; छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध
By appasaheb.patil | Published: July 21, 2020 11:24 AM2020-07-21T11:24:04+5:302020-07-21T11:58:35+5:30
पंढरपूर, दक्षिण सोलापूर, माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना संतप्त
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला़ सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ दर व ५ प्रतिलिटर ५ अनुदान देण्याची सुबुध्दी देण्याची प्रार्थना केली़ तुंगत गावांसह परिसरातील दुध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला़ ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालुन साकडे घातले.
यावेळी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सरपंच आगतराव रणदिवे, औदुंबर गायकवाड, नवनाथ रणदिवे, विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे, रामकृष्ण नागणे, आविराज रणदिवे, रमेश आद, गणेश रणदिवे, श्रीकांत आवताडे आदी उपस्थित होते़
याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदविला़ दरम्यान, पंढरपूर अज्ञात एकाने रस्त्यावर टायर पेटविले.
--------------------
अंबाड येथे रस्त्यांवर ओतले दूध
दूध न घेण्याची विनंती केल्यानंतरही दूध खरेदी केल्याने नेचर डिलाईट डेअरीतील दूध रस्त्यांवर ओतून अंबाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. सिध्देश्वर घुगे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
------------------
रिधोरे येथे ग्रामदैवताला अभिषेक
पंढरपूर तालुक्यातील रिधोरे येथील ग्रामदैवत श्री रूद्रेश्वराला दुधाचा अभिषेक करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. दूध दरवाढ झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महावीर सावळा, सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, सत्यवान गायकवाड आदी उपस्थित होते.
----------------------
मेंढ्यांना दुधाची आंघोळ
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. वेळापूर येथील ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दुधाने शेळ्या-मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.