राज्यात दुधाचा दर कोसळला ! ‘महानंद’सह खासगी संघांचा दूध दर २१ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:07 PM2017-11-02T13:07:22+5:302017-11-02T13:30:45+5:30
शासन अखत्यारित ‘महानंद’सह राज्यातील खासगी दूध डेअरी चालकांनी गाईच्या दुधाचा दर २१ रुपये प्रति लिटर केला असून, सहकारी संघाला मात्र प्रति लिटर २७ रुपये दर देण्याबाबतचे बंधन आहे.
अरूण बारसकर
सोलापूर दि २ : शासन अखत्यारित ‘महानंद’सह राज्यातील खासगी दूध डेअरी चालकांनी गाईच्या दुधाचा दर २१ रुपये प्रति लिटर केला असून, सहकारी संघाला मात्र प्रति लिटर २७ रुपये दर देण्याबाबतचे बंधन आहे. एकीकडे सहकारी संघ मोडित निघत असताना दुधाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील शेतकºयांनी संप केल्यानंतर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी २१ जून रोजी गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर २४ रुपयांवरुन २७ रुपये वाढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा वाढीव दर देणे सहकारी संघानेही मान्य केले नव्हते. मात्र शासनाच्या कारवाईच्या भीतीने सहकारी संघाने दूध दरवाढ दिली. ‘महानंद’नेही आठ सप्टेंबरपर्यंत २७ रुपये दराने गाईचे दूध खरेदी केले. मात्र खासगी दूध संघांनी २५ रुपयांपेक्षा अधिक दर देणे परवडणार नाही, असा पवित्रा घेत दर वाढवून दिला नाही़ ‘महानंद’ने आठ सप्टेंबर रोजी गाईच्या दुधाचा दर २५ रुपयांवर आणला, त्यावेळी खासगी संघांनी दर २३ रुपये केला. त्यानंतर ‘महानंद’ने एक आॅक्टोबरपासून दुधाचा दर २४ रुपये केला. ११ आॅक्टोबरपासून हा दर ‘महानंद’ने २३ रुपये, २१ आॅक्टोबरपासून २२ रुपये व एक नोव्हेंबरपासून २१ रुपये केल्याचे लेखी पत्र काढले आहे.
महानंद व खासगी दूध संघांनी गाईच्या दुधाचा दर परवडत नसल्याने २१ रुपयांवर आणला असताना सहकारी संघांनी मात्र २७ रुपयेच दर दिला पाहिजे, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे अधिक दर देऊन कमी दराने दूध विक्री करणे परवडत नसल्याने सहकारी संघांचा सध्या आतबट्ट्याचा व्यवसाय सुरू आहे. असाच प्रकार काही महिने राहिला तर सहकारी दूध संघ मोडित निघतील, अशी भीती महानंदचे संचालक डी. के. पवार यांनी व्यक्त केली.
------------------
खासगी संघांचा दर कमी
एकीकडे शासन अखत्यारित महानंद दुग्धविकास मंत्र्यांचा आदेश झुगारुन दुधाचा दर वारंवार कमी करत २१ रुपयांवर आणत असताना खासगी संघांनी तर शासन आदेशाप्रमाणे दरवाढ न करता ती कमी केली आहे. खासगी दूध संघांनी २१ आॅक्टोबरपासून गाईच्या दुधाचा दर २१ रुपये इतका केला आहे.
राज्यात अतिरिक्त झालेल्या दुधाची पावडर तयार करुन ती निर्यात केली पाहिजे तरच दुधाचे दर टिकतील अन्यथा आणखीन खाली येतील. सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होत आहे.
- डी. के. पवार, संचालक,महानंद, मुंबई
--------------------
दुधाचे भविष्य अंधकारमय आहे. दूध पावडर १६० रुपये किलोवर आली तर दूध दर परवडणारा देणे शक्य नाही. शासनच शेतकºयांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या २१ रुपयांचा दर दिला असला तरी तो १८-१९ रुपयेही होऊ शकतो.
- दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध
-------------------------
दररोज तीन लाख रुपयांचा तोटा सहन करुन दूध संकलन सुरू ठेवले आहे. शासनाने २७ रुपयांनी दूध खरेदी करावे किंवा शेतकºयांना थेट अनुदान द्यावे तरच सहकारी संघ व शेतकरी जगणार आहे. अन्यथा खासगी संघांनी उद्या १५ रुपयांनी जरी दुधाला भाव दिला तरी शेतकºयांचा नाईलाज आहे.
- आ. प्रशांत परिचारक, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा दूध संघ