पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:23 AM2021-01-25T04:23:03+5:302021-01-25T04:23:03+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले केले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले केले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन घडविले जात आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकींग दर्शनपास आवश्यक होता. दीपावली पाडव्यापासून जरी भाविकांसाठी मंदिर खुले केले असले तरी त्यानंतरच्या कार्तिकी यात्रेच्या काळात पुन्हा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे चैत्री आणि आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकीदेखील संचारबंदीतच भाविकांविना पार पडली.
मकरसंक्रातीनंतर ऑनलाईन दर्शन बुकींग पासची अट रद्द करण्यात आली. त्यानंतर पुत्रदा एकादशी ही दर्शन चालू झाल्यापासून पहिली एकादशी आहे. यामुळे राज्यभरातील भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनरांग पंचमुखी मारुती मंदिरापर्यंत पोहोचली होती.
शहरातील मोकळ्या पडलेल्या पार्किंगच्या ठिकाणांवर भाविकांच्या गाड्यांची गर्दी दिसून आली. याबरोबर मंदिर परिसरदेखील भाविकांच्या गर्दीने गजबजून गेलेला दिसून आला. भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसरातील कुंकू-बुक्का, तुळशीच्या माळा, फूलविक्रेते, वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती, फोटोफ्रेम आदी प्रासादिक वस्तूंबरोबरच सोलापुरी चादरी, घोंगडी तसेच लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानामधून भाविकांची खरेदीसाठी गर्दी दिसत होती.
फोटो ओळी :::::::::::::::::::::: २४पंड०१
विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली आहे.