तेल्या, मर, डांबऱ्या अन् खरट्यामुळे होतोय लाखो रुपयांचा घाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:03+5:302021-07-11T04:17:03+5:30
एकीकडे डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे बागा काढून टाकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. मात्र बाग व्यवस्थापनासाठी ...
एकीकडे डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे बागा काढून टाकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. मात्र बाग व्यवस्थापनासाठी प्रतिवर्षी लाखो रुपये खर्चून डाळिंब बागांचे नियोजन केले जात आहे. उत्पन्नावेळी विविध प्रकारच्या संकटाशी सामना करताना अनेक शेतकऱ्यांना पदरी घाटा घ्यावा लागत आहे. यामुळे कोळेगाव (ता. माळशिरस) येथील बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढण्यावर भर दिला आहे.
ना दाद ना फिर्याद
डाळिंब उत्पादक गेल्या काही वर्षांपासून विविध संकटाचा सामना करीत आहेत. डाळिंब संशोधनात अशा रोगांवर संशोधन होऊ शकले नाही. याशिवाय विमा पद्धतीवरही शेकडो शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना कागदावरच राहिल्या. बाग व्यवस्थापनासाठी खते व औषधांसाठी लाखो रुपयांचे कर्ज शेतकऱ्याच्या माथी पडले. यामुळे एकेकाळी कल्पवृक्षाप्रमाणे शेतकऱ्यांना भासणारे डाळिंब काही शेतकऱ्यांना ते उद्ध्वस्त करीत आहे.
कोट ::::::::::::::::
एकरी एक लाख याप्रमाणे ४ एकर डाळिंबाच्या शेताला ४ लाख रुपये दोन वर्ष खर्च केला. हजारो रुपयांचा पीकविमा भरला होता. उत्पन्न काही हाती आले नाही. पीकविमाही नाकारला गेला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे अखेरीस डाळिंब बाग काढण्याचा निर्णय घेतला.
- धनंजय बेंदगुडे
डाळिंब उत्पादक शेतकरी, कोळेगाव