शहरातील फेरीवाल्यांकडून उकळले लाखो रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:06+5:302020-12-05T04:42:06+5:30
आयुक्तांनी बजावली नोटीस, कारवाईकडे लक्ष सोलापूर : कोरोनाच्या काळात मनपाच्या यूसीडी विभागातील कर्मचारी आणि एका खासगी कंपनीने कागदपत्रे ...
आयुक्तांनी बजावली नोटीस, कारवाईकडे लक्ष
सोलापूर : कोरोनाच्या काळात मनपाच्या यूसीडी विभागातील कर्मचारी आणि एका खासगी कंपनीने कागदपत्रे जमवण्याच्या नावाखाली चार हजार पथविक्रेत्यांकडून प्रत्येकी एक हजार ते १२०० रुपये उकळल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यासंदर्भात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कंपनीचे काम तूर्त थांबविले आहे.
शहरात हॉकर झोन निश्चित करण्यासाठी बारा हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचे काम उस्मानाबादेतील ओयासीस कंपनीला देण्यात आले. यासाठी मनपाकडून या कंपनीला पैसेही देण्यात येतात. कोरोनाच्या काळात पथविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना बँकांकडून दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्जही दिले जात आहे. शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना याचा लाभ मिळावा यासाठी ऑगस्ट महिन्यात फेरीवाला समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पथविक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, पथविक्रेत्यांकडून विविध प्रकारची कागदपत्रे जमविण्यासाठी पुन्हा पैसे घेण्यात आले. एका एका विक्रेत्याकडून एक हजार ते १२०० रुपये उकळण्यात आल्याची तक्रार महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसवेक शिवानंद पाटील यांनी केली. आयुक्तांनी नागरी समुदाय प्रकल्प (यूसीडी) विभागाच्या व्यवस्थापक वैशाली आव्हाड यांच्याकडून याबाबत खुलासा मागवला.
लाखो रुपये कमावले
सर्वेक्षणाचे काम मोफत करावे, असे फलक महापालिकेने लावले होते. तरीही कागदपत्रांच्या नावाखाली पैसे उकळण्याचे काम सुरू राहिले. त्यातून लाखो रुपये कमावण्यात आले. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम यूसीडी विभागातील कर्मचाऱ्यांचे होते. मात्र हेच लोक त्यात सहभागी झाले, अशा तक्रारीही नगरसेवकांनी केल्या आहेत.
---
ओयासीस कंपनीचे फेरीवाला सर्वेक्षणाचे काम थांबविले आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी यूसीडीच्या व्यवस्थापकांकडून खुलासा मागवला होता. इतर तीन कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई होईल.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, मनपा.