एमआयएमची यादी जाहीर; शहर मध्यमधून फारुक शाब्दी, ‘दक्षिण’मधून सोफिया शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:54 AM2019-09-23T10:54:18+5:302019-09-23T10:58:49+5:30
विधानसभा निवडणूक; एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केली.
सोलापूर : एमआयएमने शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून फारुक शाब्दी तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सोफिया तौफिक शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी रविवारी राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख दावेदार होते. परंतु, विजयपूर येथील रेश्मा पडकनूर यांच्या खून प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. ते सध्या विजयपूर येथील तुरुंगात आहेत. त्यामुळे पक्षाने तौफिक शेख यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी उद्योजक फारुक शाब्दी यांना उमेदवारी दिली. तौफिक शेख यांच्या पत्नी सोफिया शेख यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
सांगोला मतदारसंघातून शंकर सरगर उमेदवार असतील. एमआयएमच्या नई जिंदगी येथील कार्यालयात शाब्दी आणि शेख यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी तौफिक शेख तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. पक्षाने उमेदवार तौफिक शेख यांच्या पत्नी सोफिया यांना शहर मध्यमधून का उमेदवारी दिली नाही?, असे विचारले असता शाब्दी म्हणाले, निर्णय घेण्यापूर्वी पक्षाने तौफिक शेख यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर पक्षाने निर्णय घेतला. सोलापूर दक्षिणमध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत. त्याचा फायदा सोफिया शेख यांना होणार आहे.
जे होईल ते पाहता येईल - सोफिया शेख
- उमेदवारीबद्दल सोफिया शेख यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, ‘ही तर माझी सुरुवात आहे. जे होईल ते पाहता येईल. एवढंच सांगते’. जनतेला आमच्या पक्षाबद्दल आपुलकी आहे. त्याच जोरावर आम्ही जिंकू, असे स्पष्टीकरण दिले.