चंद्रभागा नदीची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न : मेधा पाटकर
By रवींद्र देशमुख | Published: May 10, 2024 07:40 AM2024-05-10T07:40:19+5:302024-05-10T07:41:23+5:30
पंढरपुरात समता वारी सोहळा
रविंद्र देशमुख
सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या संतभूमीत चंद्रभागेची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न झाल्याची भावना नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. त्या समता वारी सोहळा निमित्त पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत साने गुरुजी स्मारकाचे प्रमुख संजय गोपाळ प्रा. डॉक्टर राजेंद्र कुंभार जयसिंगपूर, राजन इंदुलकर, प्रा. रामचंद्र वाघ, भार्गव पवार उपस्थित होते.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, संतांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी संत विचार पिठाची गरज आहे. नव्या पिढीला ती प्रेरणा देणारी आहे. साने गुरुजींचे केवळ विचार व कार्य मनाला भावणारे आहे. संतांचे संघर्ष महत्त्वाचे असून त्यांचे विचार जिवंत आहेत. संविधानाचे अधिकार पूर्ण करण्यासाठी विचारांची गरज सध्याच्या पिढीला आहे. या सद्य परिस्थितीत सरकारवर विश्वास ठेवू नये त्यांचे पक्षीय राजकारण वेगळं आहे. समाज राजकारण वेगळे आहे. समाजवादाची भूमिका त्यावेळी साने गुरुजींनी ठेवली होती. त्यांचे विचार व त्यांना मानणारे आजही आहेत.
आजही जाती-धर्माच्या नावाने विभाजन होत असून अजूनही जातीवाद मिटला नाही. जाती निर्मूलन हवे आहे परंतु असंवेदनशील सरकार संवाद साधायला तयार नाही याचे दुर्दैव वाटते. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असे आश्वासन या सरकारने दिले होते. परंतु स्वामीनाथन आयोगाच्या आधारावर शेतक-यांना दर मिळाला पाहिजे. त्यांनी तेच हटवले आहे. शेतकऱ्यांचे स्थान व सन्मान वाढला पाहिजे.