मनाला आध्यात्मिक समाधान लाभले ; सीईओ राजेंद्र भारूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:25 PM2018-07-18T14:25:30+5:302018-07-18T14:26:27+5:30
पंढरपूर आषाढी वारीसाठी योगदान देणाºया सोलापूर जिल्ह्यातील महत्वांच्या अधिकाºयांची ’अधिकाºयांची वारी‘ हे ’लोकमत’ चे विशेष सदर
मागील वर्षी मी सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार घेतला. वारी तोंडावर होती. गर्दीचा आकडा ऐकून मनात चिंता आलीच होती. सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे की, या जिल्ह्यात सर्व पालख्या एकत्र येतात. दुपारचा विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात.
ग्रामसेवक, अभियंते, सरपंच, पदाधिकारी, स्वच्छता विभागातील कर्मचारी या सर्वांना घेऊन काम करायचे होते. मुख्यमंत्रीच महापूजेला येणार असल्याने त्यांना सर्व प्रकारचे रिपोर्टिंग होणार या सर्व गोष्टींचाही अंदाज आला होता; पण कामाला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी मूलभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि स्वच्छता या कामांना प्राधान्य दिले.
पालखी मार्गावर एकाचवेळी अनेक लोक चालत असल्याने आरोग्याच्या सुविधा देण्यात अडचणी येतात हे लक्षात आले. त्यावर आरोग्य दूत ही संकल्पना समोर आली. एका दुचाकीवर दोघांना बसवून मागे एका बॉक्समध्ये प्रथमोपचार साहित्य, महत्त्वाची औषधे ठेवण्यात आली. या आरोग्य दूतांनी उत्तम काम केले तसे इतर विभागांनीही चांगले काम केले. मनाला एक आध्यात्मिक समाधान लाभले. मागील वर्षीच्या अनुभवाचा यंदा खूप फायदा होतोय.
आषाढी वारी हा भक्तीचा सोहळा आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकºयाला राहण्यासाठी कोरडी जागा, पिण्यास चांगले पाणी, शौचालये, आरोग्य सुविधा पुरविणे याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वारकरी हा मुळातच विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो, त्याला दुसरे काही दिसत नाही. गरिबातला गरीब माणूस यात सहभागी असतो.
वारकºयांच्या चेहºयावर एकप्रकारचे समाधान पाहायला मिळते. मी पाहतोय की अनेक लोक दिवसभर भजन, कीर्तन, फुगडी यामध्ये दंग असतात. एकमेकांची काळजी घेतात. ज्या परिस्थितीत आपण आलोय त्याच परिस्थितीत आनंदात जगू आणि वारी पूर्ण करू, हीच भावना त्यांच्यामध्ये दिसते. यंदाच्या वर्षीही आम्ही पालखी मार्गावरील गावांमध्ये वेळेवर अनेक कामे करून घेतली. हॅँड वॉश मोबाइल व्हॅन ही आमची यावर्षीची वेगळी संकल्पना आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आम्ही प्रत्येकी दोन व्हॅन लावल्या आहेत. दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक वारकºयांनी या व्हॅनचा फायदा घेतला आहे. वारी हे समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे, हे यातून लक्षात येते. या कामांमधून आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी विठ्ठलाची आणि वारकºयांची सेवा बजावत आहेत.
शब्दांकन : राकेश कदम