राज्याचे मंत्री म्हणतात कोरोना नाही, तर व्यापाऱ्यांची दुकाने बंद का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:08+5:302021-04-07T04:23:08+5:30
पंढरपूर येथे व्यापारी कमिटीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी आ. परिचारक यांच्याजवळ मांडल्या. यावेळी ...
पंढरपूर येथे व्यापारी कमिटीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी आ. परिचारक यांच्याजवळ मांडल्या. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष सत्यविजय मोहळकर, दीपक शेटे, राजेश कपडेकर, दिगंबर गडम, एम. पाटील, वसंतराव जवंजाळ उपस्थित होते.
पुढे परिचारक म्हणाले, विठ्ठल मंदिरामुळे पंढरपुरातील व्यापारी जगतात. आता पुन्हा मंदिर पुन्हा बंद केले आहे. यामुळे व्यवसाय मंदावला आहे. अशातच सरकारने लॉकडाऊन करत दुकाने बंदचे आदेश काढले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर करा आम्ही दुकाने उघडणार, असा पवित्रा पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
----
कोरोना आहे तर निवडणुका कशाला लावल्या?
निर्बंध घालून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनला विरोध करत दुकाने उघडण्याचा निर्णय पंढरपूरमधील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. कोरोना आहे तर निवडणुका कशाला लावल्या असा सवाल देखील आ. परिचारक यांनी सरकारला केला.
हिटलरशाही लॉकडाऊन : धोत्रे
देशात पुण्यात जादा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ते पुणे शहर सुरु आहे. मात्र सोलापूर जिल्हा लॉकडाऊन करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. वर्षभरापासून व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या हिटलरशाही पद्धतीच्या लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे संसार उदध्वस्त करण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्याचाआरोप मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे केला.
----
राष्ट्रवादीचा असफल प्रयत्न
व्यापारी कमिटीची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते व्यापारी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी भट्टड यांना उपमुख्यमंत्री तुमच्याशी बोलतील म्हणून फोन लावून देण्याचा प्रयत्न केला मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरु होती. यामुळे त्यांचे बोलणे झाले नाही. पवार तुम्हाला पुन्हा बोलतील असा निरोप देण्यात आला. दरम्यान आ. परिचारकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोन लावून देण्याचे आश्वासन दिले मात्र व्यापारी आपल्या भूमिकेवर ठार राहिले.