हमालाचा मुलगा झाला मंत्रालयातील अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:19 PM2019-03-29T13:19:16+5:302019-03-29T13:23:10+5:30
इरफान शेख कुर्डूवाडी : ‘सरस्वती प्रसन्न असली की यशाची कवाडे आपोआप उघडली जातात’ याची प्रचिती आली आहे ती अकुलगाव ...
इरफान शेख
कुर्डूवाडी : ‘सरस्वती प्रसन्न असली की यशाची कवाडे आपोआप उघडली जातात’ याची प्रचिती आली आहे ती अकुलगाव येथील विकास कल्याण शिंदे यांना. परिश्रम व अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत त्यांनी राज्यात पाचवा क्रमांक मिळविला.
शालेय जीवनापासूनच विकास हुशार होता. त्याचे शिक्षण अकुलगाव जि.प.शाळा, नूतन विद्यालय हायस्कूल कुर्डूवाडी, के.एन.भिसे कॉलेज कुर्डूवाडी येथे झाले आहे. त्याचे वडील कुर्डूवाडी येथील रेल्वे मालधक्क्यात गेल्या २५ वर्षांपासून हमालीचे काम करतात तर आई शेतात कामाला जाते. मात्र आपल्या मुलाने खूप शिकून मोठे व्हावे ही त्यांची आधीपासून इच्छा होती.
पदवीचे शिक्षण झाल्यानंतर त्याने एमपीएससीचा अभ्यास सुरु केला़ पहिल्या प्रयत्नात त्याने पोलीस होण्यात यश मिळविले़ त्याची नेमणूक ठाणे शहर येथे झाली पण त्याची महत्वकांक्षा व आई वडीलांचे ध्येय यामुळे पुढे अभ्यास सुरुच ठेवला.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा तो उत्तीर्ण झाला, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षाही उत्तीर्ण झाला, मात्र तेथेही त्याचे मन रमेना. पुन्हा त्याने मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकाºयाची परीक्ष दिली. त्यात तो राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
पुढेही परीक्षा देणारच
- कुटुंंबाचा, आईवडील व मित्रपरिवाराचा पाठिंबा असल्याने मी हे यश संपादन केले आहे. वेळेचे नियोजन करुन अभ्यास केला, मात्र मैदानाशी मैत्री कधीही सोडली नाही. मिळालेली नोकरी स्वीकारत, पुढील परीक्षा देतच राहणार असे उद्दिष्ट असल्याचे विकास शिंदे यांनी स्पष्ट केले.