पंचायत राज मंत्रालयाने घेतली चिंचणीच्या कोविड व्यवस्थापन, वृक्षारोपणाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:28+5:302021-05-30T04:19:28+5:30

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यातून विस्थापित झाल्यानंतर पिराची कुरोलीच्या माळावर त्याचे पुनर्वसन करण्यात आले. ...

Ministry of Panchayat Raj took care of Chinchani Kovid management, tree planting | पंचायत राज मंत्रालयाने घेतली चिंचणीच्या कोविड व्यवस्थापन, वृक्षारोपणाची दखल

पंचायत राज मंत्रालयाने घेतली चिंचणीच्या कोविड व्यवस्थापन, वृक्षारोपणाची दखल

Next

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यातून विस्थापित झाल्यानंतर पिराची कुरोलीच्या माळावर त्याचे पुनर्वसन करण्यात आले. ओसाड माळावर वसलेल्या या गावातील नागरिकांनी मोठ्या कष्टाने नंदनवन फुलवले आहे. विविध प्रकारची हजारो झाडे लावली आहेत. रेन हार्वेस्टिंग, सौरऊर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती, पशु-पक्ष्यांचे संगोपन याशिवाय अनेक लोकाभिमुख पर्यावरणपूरक उपक्रम या गावाने स्वखर्चातून राबविले आहेत. त्यामुळे हे गाव राज्यभरात चर्चेत आले आहे.

सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेकडो जणांना प्राण गमवावे लागले असताना या महामारीच्या काळात चिंचणी गाव मात्र कोरोनामुक्त राहिले आहे. ग्रामस्थांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्याने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. गावच्या या कार्याची दखल केंद्रीय पंचायत राज विभागाने घेतली आहे.

शुक्रवारी पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, दिल्ली आदी राज्यांतील मोजक्याच गावातील नागरिकांशी कोरोना महामारी, पर्यावरण आदी विषयांवर संवाद साधला. यामध्ये राज्यातील चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील काही नागरिकांशी संवाद साधला. यात चिंचणी, हिवरेबाजार आदी गावांचा समावेश होता.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह चिंचणीचे ग्रामस्थही गावातूनच सहभागी झाले होते. यामध्ये हिवरेबाजारची माहिती पोपटराव पवार यांनी तर चिंचणी गावाची माहिती मोहन अनपट यांनी पंचायत राज विभागाच्या सचिवांना दिली. ही माहिती ऐकून ते चांगलेच प्रभावित झाल्याचे यावेळी दिसून आले.

हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा संवाद संपल्यानंतर केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी स्वत: फोन करून गावाची माहिती, फोटो मागवून घेतले आणि आपल्या ट्विटर हँडलवर ३ वेगवेगळ्या पोस्ट करत चिंचणीच्या कामाचे कौतुक केले आहे. शिवाय, गावातील स्वच्छता, वृक्षराजी, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, प्रशस्त आणि दुतर्फा झाडांनी बहरलेले रस्ते, स्मशानभूमी यांचे फोटोही शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चिंचणी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जात असून, गावाने केलेल्या या प्रयत्नांची दखल केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने घेतली असल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे.

देशपातळीवर मॉडेल गाव

देशात काही राज्यातील अनेक गावांना नैसर्गिक वारसा लाभला आहे. त्या जोरावर तेथे पर्यटन केंद्र उभारत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, स्वत:चा नैसर्गिक वारसा सोडून माळरानावर पुनर्वसन झाल्यानंतरही तेथे पुन्हा त्याच जोमाने नैसर्गिक वातावरण उभा करणे ही सोपी गोष्ट नाही. हे काम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील चिंचणीने केले असल्याचे देशाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. या गावाची सध्याची वाटचाल पाहता पुढील काळात हे गाव देशपातळीवर मॉडेल म्हणून नावारूपास येईल, असे कौतुक केले.

Web Title: Ministry of Panchayat Raj took care of Chinchani Kovid management, tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.