सुजात आंबेडकरांना किरकोळ अपघात, प्रचारावेळी जिप्सी गाडीतून तोल गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:21 PM2019-10-16T18:21:01+5:302019-10-16T18:33:55+5:30
सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
सोलापूर - भाजप व शिवसेनेने जाहीर केलेले जाहीरनामे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी जुमलेच ठरणार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सोलापूर दौऱ्यावेळी केली. सुजात आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीत उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, सोलापुरातील प्रचार रॅलीदरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून माझी प्रकृती उत्तम असून पुढील नियोजित दौरे करणार असल्याचेही त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी भाजपने सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत. कोणाच्याही खात्यावर 15 लाख आले नाहीत. कोणत्याही शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही, आत्महत्या थांबल्या नाहीत, पाणीप्रश्न सुटला नाही, धनगरांना आरक्षण दिले नाही मग यावर्षी दिलेल्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी पूर्ण होतील यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही, अस सुजात आंबेडकर यांनी सोलापूरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रुपाभवानी मंदिर परिसरात त्यांची प्रचाररॅली होती. त्यावेळी, अचानक कार्यकर्ते गाडीसमोर आल्यामुळे ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी आपला बॅलन्स न करणे अशक्य झाल्याने सुजात आंबेडकर गाडीतील पुढील सीटवर पडले. या अपघातात त्यांच्या ओठाला किरकोळ जखम झाली, अशी माहिती सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे प्रचारप्रमुख नगरसेवक गणेश पुजारी यांनी दिली.