अल्पवयीन मुलीला पळविले
By admin | Published: May 20, 2014 12:56 AM2014-05-20T00:56:38+5:302014-05-20T00:56:38+5:30
दोघींना अटक
सांगोला : भाच्याने आपली आई व मावशीच्या संगनमताने मामाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना जवळा (ता. सांगोला) येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आई व मावशीला अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोघींना शुक्रवारपर्यंत (२२ मे) पोलीस कोठडी सुनावली आहे. शीला शरद हालकुडे (रा. हुडको कॉलनी, जि. उस्मानाबाद) व अंबिका प्रदीप पावटे (रा. भूपेश अपार्टमेंट, प्लॅट नं. ५, विद्यानगर, कºहाड, जि. सातारा) असे आई व मावशीचे नाव असून, अक्षय शरद हालकुडे हा मुलीला घेऊन पळून गेला आहे. जवळा येथील मुलगी मंगळवारी सकाळी ८ वा. कॉलेजला जाते असे म्हणून ती घरातून बाहेर पडली. मात्र दुपारी १ वाजेपर्यंत कॉलेजला गेलेली मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बुधवारी (१४ मे) कुटुंबीय शोधाशोध करीत असताना मेहुणीच्या मोबाईलवर भाचा अक्षयने फोन करून तुमची मुलगी मी पळवून नेली आहे, असे सांगितले. यावेळी अक्षयने एवढ्यावरच न थांबता मुलगी पळवून नेली आहे, तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या, असा दमही मामाला दिला. घडल्या प्रकाराची माहिती बहिणीस सांगितली असता, तिनेही मुलीला पळविल्याचे समर्थन केले. ही कौटुंबिक घटना असल्याचे भावाने कºहाड येथील बहिणीस सांगितले. यावेळी तिनेही माझ्याच सांगण्यावरुन मुलीस पळविल्याचे सांगितले. अखेर मुलीच्या वडिलांनी शीला हालकुडे, अंबिका पावटे व अक्षय हालकुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलिसात मुलीस पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली. स. पो. नि. ज्ञानेश्वर कर्चे यांनी शीला हालकुडे व अंबिका पावटे यांना अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तपास अधिकारी ज्ञानेश्वर कर्चे मुलीला पळवून नेलेल्या अक्षयचा शोध घेत आहेत.