सोलापूर जिल्ह्यातील ३८ मंडलांत अल्प पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:27 PM2018-07-19T12:27:04+5:302018-07-19T12:28:57+5:30
खरीप पेरणी मात्र १४३ टक्के : केवळ बार्शी तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली
सोलापूर: जिल्ह्यातील ३८ मंडलात अल्प व अत्यल्प पाऊस पडला असून, केवळ बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारी सांगते. जिल्हाभरातील शेतकºयांनी खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणात केल्याने उद्दिष्टाच्या १४३ टक्के पेरणी झाली आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा अधिक व चांगला पाऊस असल्याचा अंदाज पावसाळा सुरू होण्याअगोदर वर्तविला होता. वेगवेगळ्या संस्थांकडून वारंवार पाऊस चांगला असल्याचे अंदाज सांगितले गेल्याने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त केला जात होता; मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अंदाजाप्रमाणे पाऊस पडत नसल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ९२ मंडलांपैकी केवळ बार्शी तालुक्यातील ९ मंडलात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला मंडलातही अवघा ५१ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील ३८ मंडलात अल्प व अत्यल्प पावसाची नोंद झाली असून काही मंडलात तर फारच कमी पाऊस पडला आहे.
उत्तर, दक्षिण तालुका, अक्कलकोट तालुक्यातील तीन मंडल, मोहोळचे दोन मंडल,माढ्याचे पाच मंडल, करमाळ्याचे ५ मंडल, पंढरपूरचे दोन मंडल, सांगोल्याचे चार मंडल, माळशिरसचे चार मंडल, मंगळवेढ्याच्या पाच मंडलामध्ये अल्प व अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.
पावसाळा सुरु होण्याअगोदर पाऊस चांगला असल्याचे अनेक संस्थांनी अंदाज वर्तविल्याने खरिपाची पेरणी मात्र उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. जिल्ह्याचे खरीप पेरणीचे उद्दिष्ट ७९ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात एक लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
मार्डी मंडलात अवघा १६ मि.मी. पाऊस
- - मार्डी मंडलात अवघा १६ मि.मी. तर तिºहे मंडलात ५० मि.मी. पाऊस पडला. दक्षिणच्या बोरामणी मंडलात ४५ मि.मी., वळसंग मंडलात ५४ मि.मी., मुस्ती मंडलात ५८ मि.मी., बार्शीच्या उपळे दुमाला मंडलात ५१ मि.मी., जेऊर मंडलात ६१ मि.मी., करजगी मंडलात ७५ तर तडवळ मंडलात ८१ मि.मी., मोहोळ तालुक्यातील शेटफळ मंडलात २० मि.मी., कामती बु. मंडलात ९६ मि.मी., माढा तालुक्यातील टेंभुर्णी मंडलात २१ मि.मी., म्हैसगाव मंडलात २३ मि.मी., लऊळ मंडलात ५२ मि.मी., रोपळे(क) मंडलात ६० मि.मी., तर मोडनिंब मंडलात ८२ मि.मी. पावसाची नोंद झाली. करमाळा तालुक्यात उम्रड व केत्तूर मंडलात ६७ मि.मी., जेऊर मंडलात ७० मि.मी. तर केम मंडलात ८३ मि.मी. पाऊस पडला.
- - पंढरपूर तालुक्यातील चळे मंडलात ६२ मि. मी., तुंगत मंडलात ८५ मि.मी., सांगोला तालुक्यात सोनंद मंडलात ३९ मि.मी., हतीद मंडलात ५३ मि.मी., नाझरामध्ये ५७ मि.मी. तर जवळामध्ये ५९ मि.मी. पाऊस पडला. माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर मंडलात २३ मि.मी., वेळापूर मंडलात ५६ मि.मी., दहिगाव मंडलात ५९ मि.मी., लवंग मंडलात ७६ मि.मी. तर मंगळवेढा तालुक्यातील मरवडे मंडलात ४१ मि.मी., भोसे मंडलात ५५ मि.मी., हुलजंती व मारापूर मंडलात प्रत्येकी ६७ मि.मी. तर आंधळगाव मंडलात ८० मि.मी. पाऊस पडला आहे.
चांगला पाऊस पडण्याच्या अंदाजाने खरिपाची पेरणी दीडशे टक्क्यांपर्यंत झाली आहे. आता चांगला व सतत पाऊस पडत राहिला तरच पिके पदरात पडतील. चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
- बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी