रस्ता चुकला अन् रात्र बागेत काढली; सकाळी दोन्ही मुलं आई-बाबांच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 06:01 PM2021-12-15T18:01:06+5:302021-12-15T18:01:14+5:30
सोलापूर शहर पोलिसांची तत्परता : १२ तासांनंतर लागला शोध
सोलापूर : खेळताना निघून गेलेली पाच वर्षांच्या आतील दोन मुलांनी अख्खी रात्र बगिचामध्ये काढून दुसऱ्या दिवशी आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचले. बारा तासांनंतर आपल्या मुलांना सुखरूप पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही घटना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सागर विजय महेश (वय ३२, रा. पाणीवेस तालीम, दत्त मंदिराजवळ) हे फुटपाथवर प्लास्टिकचे साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात व तेथेच आपल्या पत्नी आणि चार मुलांसमावेत राहतात. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा पाच वर्षांचा मुलगा ओंकार, दोन वर्षांची मुलगी समृद्धी हे दोघे खेळता-खेळता निघून गेले. उशिरापर्यंत वाट पाहून आई-वडिलांनी मुलांचा शोध घेतला. त्यानंतर सोमवारी पहाटे फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठत हकिकत सांगितली. पोलिसांनाही तत्परता दाखवीत गुन्हा दाखल करून घेत मुलाचा शोध सुरू केला; पण सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही मुले पुन्हा आई-वडिलांकडे आली. या घटनेचा तपास सपोनि विष्णू गायकवाड यांच्याकडे होता.
मुलांनी अख्खी रात्र बगिच्यामध्ये काढली
दोन्ही मुले खेळता खेळता रस्त्यावरून किल्ला बगिचा परिसरात गेली. तेथे रात्री रस्ता न सापडल्यामुळे बगिचामध्येच झोपी गेले. रात्र तेथेच काढल्यानंतर या मुलांनी सकाळी कसेबसे पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे पोहोचले, अशी माहिती आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात दिली.