बेपत्ता मित्राच्या मुलाला शोधताना लादेन देऊ लागले बेवारस, वारस प्रेतांना मुक्ती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 07:09 PM2019-07-08T19:09:49+5:302019-07-08T19:11:57+5:30
पोलिसांना लाभते सहकार्य : मदतीच्या भावनेने अंत्यसंस्कारासाठी गरिबांना पैसे देण्यातही पुढाकार
संताजी शिंदे
सोलापूर : मित्राच्या व्यसनाधीन मुलाचे व्यसन सोडविण्यासाठी एसटी बसने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिद्धापूरला घेऊन जाताना हा मुलगा हातचा निसटून गेला अन् बेपत्ता झाला. एका शववाहिका चालकाशी दोस्ती करून त्या मुलाला शोधता शोधता शास्त्रीनगरातील लादेन उर्फ जहाँगीर शेख यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली अन् ते बेवारस प्रेतांवर कायद्याच्या चौकटीत राहून अंत्यसंस्कार करू लागले. अशी प्रेते काढताना पोलिसांना मदत करू लागले. शिवाय गरिबांच्या घरातील कुणी मृत पावल्यास अंत्यसंस्कारासाठी मदतही करू लागले.
मित्राच्या आग्रहावरून २00६ साली लादेन अहमद याला सिद्धापूर (दक्षिण सोलापूर) येथील समाजाच्या मशिदीत मुलाला सोडण्यासाठी जात होते. सिद्धापूरला जाताना एस.टी. बेगमपूर- कामतीच्या दरम्यान एका थांब्यावर थांबली.
एस.टी. थांबताच मित्राच्या मुलाला खाली उतरविले, लादेन यांनी त्याला विरोध केला असता त्याने दगडफेक करण्यास सुरूवात केली. कसेबसे त्याला रोखून धरले झाडाखाली बसवले. मुलाच्या वडिलाला फोन करण्यासाठी लादेन काही अंतरावर असलेल्या ढाब्यावर गेले. मात्र ही संधी साधून मित्राचा मुलगा अहमद निघून गेला, आपल्या हातून मित्राचा मुलगा बेपत्ता झाल्याचे शल्य लादेन यांना बोचत होते. तो कुठेतरी भेटेल या आशेने लादेन ठिकठिकाणच्या एस.टी.स्टॅन्डवर शोध घेत होते. काहीच पत्ता लागत नव्हता. मित्राचा मुलगा व्यसनी असल्याने तो कुठेतरी बिकट परिस्थितीत भेटेल या आशेने त्यांनी अॅब्म्युलन्स चालक मजिद शेख यांना अहमदची माहिती दिली.
कालांतराने लादेन मजिद शेख यांच्यासोबत अॅम्ब्युलन्स मधून फिरत होते.
फिरत असताना ते बेवारस-वारस मृतदेह काढून त्यांना रूग्णालयात आणू लागले. मृत्यूनंतर माणसाची अवस्था पाहून सख्खे नातेवाईकसुद्धा जवळ येत नव्हते. तिथे लादेन पुढे जाऊन मृतदेह काढू लागले. लादेनचे काम पाहून समाजाच्या लोकांनी कौतुक केले, प्रोत्साहन दिले. लादेन यांनी २00८ साली बैतुलमाल सिफा कमिटीची स्थापना केली. एखाद्या मयताच्या वारसाला अंत्यविधीसाठी पैसे नसतील तर त्याचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास सुरूवात केली. समाजातील काही दानशूर व्यक्तींनीही या कार्याला मदत करण्यास सुरूवात केली. लादेन यांनी स्वत:ची अॅम्ब्युलन्स व्हॅन घेतली आणि माणुसकीच्या सेवेला गती दिली.
पोलिसांचा पहिला फोन लादेनला...
- शहरात किंवा अन्यत्र जर खून झाला असेल, फाशी किंवा अन्य प्रकारची आत्महत्या असेल, विहिरीत पडून मृत्यू झाला असेल, अपघाती मृत्यू असेल अशा पद्धतीचा माणसाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झालेला असेल तर प्रेत उचलण्यासाठी लादेन यांना पोलिसांचा फोन येतो. चोवीस तास उपलब्ध असलेले लादेन आपली अॅम्ब्युलन्स घेऊन घटनेच्या दिशेने निघतात.
- माणसाचा जीव असताना त्याला किंमत असते. जीव गेला की त्याची अवस्था जनावरासारखी होते. दररोज मृतदेह काढून सवय झाली आहे. जीवन खूप सुंदर आहे़ चांगलं जगावं, चांगलं राहावं आणि सन्मानानं मरण पत्करावं. देवाने माझ्यावर वारस-बेवारस मृतदेहाचं काम करण्याची संधी दिली आहे. माणुसकीचा धर्म म्हणून मी या कामाकडे पाहतो़ त्यातून मिळणाºया मानधनावर घर चालवतो. बेवारस मृतदेहाचा शोध लागला की त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचवण्याचं काम करतो. लोक रडतात, आभार मानतात मी त्यांच्या दु:खात सहभागी होतो आणि निघून येतो. असे जहाँगीर शेख उर्फ लादेन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.