दोन दिवसांपासून बेपत्ता गव्याने ग्रामस्थांचे टेन्शन वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:17 AM2021-06-01T04:17:01+5:302021-06-01T04:17:01+5:30
अक्कलकोट : तालुक्यातील कलहिप्परगे येथील शिवारात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला गवा अद्याप सापडला नाही. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी ...
अक्कलकोट : तालुक्यातील कलहिप्परगे येथील शिवारात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला गवा अद्याप सापडला नाही. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे पथक ठाण मांडून बसलेले आहे. यामुळे परिसरातील पाच गावांचे टेन्शन वाढले आहे.
रविवारी कलहिप्परगे येथील पोलीसपाटील संतोष गुजा यांना हा गवा दिसला होता. त्यानंतर एका महिलेने या गव्याला पाहिले होते. ग्रामस्थांना कळविल्यानंतर गर्दी जमली. शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शींची भेट घेऊन गवा असल्याची खात्री केली. वनविभागाच्या पथकाने दुसऱ्या दिवशी परिसर पिंजून काढला, मात्र गवा दिसला नाही.
कोट
आपण प्रत्यक्ष घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर गव्याची माहिती घेतली. या परिसरातील गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गवा दिसल्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवावे. जनजागृती व पेट्रोलिंग सुरू ठेवले आहे. उसाचे क्षेत्र अधिक असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत.
जयश्री पवार
अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर