मिशन ११ वी प्रवेश..सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:37 PM2019-06-13T12:37:03+5:302019-06-13T12:38:25+5:30
पहिल्या दिवशी ५,४४८ फॉर्म विक्री; पाठोपाठ वाणिज्य, कला, संयुक्त शाखेचा नंबर
सोलापूर: दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला अन् आता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. बुधवारपासून इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विविध महाविद्यालयांमधून एकूण ५ हजार ४४८ फॉर्मची विक्री झाली आहे. यामध्ये विज्ञान शाखेसाठी ३१७२, वाणिज्य शाखेसाठी १८२०, कला शाखेसाठी २७७ तर संयुक्त शाखेसाठी १७९ प्रवेश फॉर्म विद्यार्थ्यांनी घेऊन गेल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. इंटरनेटवरून काढलेली गुणपत्रिका प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. बुधवारी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत फॉर्म विक्रीला प्रारंभ झाला.
पहिल्या दिवशी वालचंद महाविद्यालयामधून विज्ञान शाखेसाठी १३६७ अर्ज विद्यार्थ्यांनी नेले. त्यापाठोपाठ ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयातून ४३६, डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालयातून ४३० अर्जांची विक्री झाली. या तिन्ही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. कला शाखेसाठी वालचंद महाविद्यालयातून १०३ अर्ज नेण्यात आले. गुरुवारपासून फॉर्म विक्रीला वेग येईल, असे जि.प. शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
कोणत्या महाविद्यालयातून किती अर्जांची विक्री
- शहरातल्या विविध महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नेलेले अर्ज असे- व्ही. जी. शिवदारे कनिष्ठ महाविद्यालय: (विज्ञान शाखा- ८०), स्वामी विवेकानंद कला, विज्ञान महाविद्यालय: (कला- ११, विज्ञान शाखा- २२, संयुक्त: ३३), शरदचंद्र पवार महाविद्यालय (कला- १, वाणिज्य- २), हरिभाई देवकरण महाविद्यालय: (कला- ६२, विज्ञान- १६७, वाणिज्य- १५०), संगमेश्वर महाविद्यालय: कला- १०, विज्ञान- २०७, वाणिज्य- ८२), रामकृष्ण बेत नाईट कॉलेज (संयुक्त- १), एसईएस कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान- १४५, संयुक्त- ६), डीबीएफ दयानंद कॉलेज (कला- ६५, विज्ञान- ४३०), ए. डी. जोशी महाविद्यालय (विज्ञान- ४३६), अलकनंदा जोशी कॉलेज (विज्ञान- १०५), वालचंद कॉलेज (कला- १०३, विज्ञान- १३६७), भारती विद्यापीठ (विज्ञान- १७७, संयुक्त- १४०), कुचन महाविद्यालय (कला- २६, विज्ञान- ३६, संयुक्त - वाणिज्य- १४०), डीएव्ही वेलणकर कॉलेज (वाणिज्य- २८६), हिराचंद नेमचंद कॉलेज (वाणिज्य- ११६२).
असे आहे नियोजन
- - २४ ते २८ जूनदरम्यान भरलेले अर्ज महाविद्यालयात जमा करायचे आहेत. यावेळी दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत देणे गरजेचे आहे. २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीन स्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
- - पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला सादर करायचा आहे.
- - दुसरी गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलैदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तिसºया गुणवत्ता यादीनुसार ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.