मिशन ॲडमिशन; अकरावी प्रवेश अर्ज भरल्याच्या खात्रीसाठी पालकांचे महाविद्यालयात हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 05:45 PM2021-08-24T17:45:12+5:302021-08-24T17:45:19+5:30
अकरावी प्रवेश : उद्या अंतिम मुदत; गुणवत्ता यादीची उत्सुकता
सोलापूर : सध्या कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. सोबत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही शहरात ऑनलाइन आणि ग्रामीण भागात ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्यामुळे अकरावीचे फॉर्म ऑनलाइन भरल्यानंतर फॉर्म भरल्याची खात्री करून घेण्यासाठी पालक महाविद्यालयात जात आहेत.
अकरावीची प्रवेश प्रक्रियेला बुधवार, १८ ऑगस्टपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उद्या, २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. यंदा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे गुणवत्ता यादी उंचावेल असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये याबाबत उत्सुकता लागली आहे.
शहरातील काहीच महाविद्यालयांत अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन सुरू आहे. उर्वरित सर्वच महाविद्यालयांत ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामुळे अनेक विद्यार्थी हे ऑनलाइन प्रवेशापेक्षा ऑफलाइन फॉर्म भरून देण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक दिवसांनंतर महाविद्यालय हे गजबजलेले दिसत आहे.
मी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. मी अकरावीला अर्ज केल्यानंतर प्रवेशाच्या फॉर्मवर मात्र बारावीसाठी अशी माहिती येत आहे. त्यामुळे याबाबतची विचारणा करण्यासाठी महाविद्यालयात आलो आहे.
वीरेंद्र हिचडे, विद्यार्थी
विद्यार्थी ऑफलाइनला देतात प्राधान्य...
शहरातील बहुतांश महाविद्यालयात ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू असल्यामुळे विद्यार्थी ऑफलाइन ठिकाणी प्राधान्य देत आहेत. तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अनेक शंकांचे निरसनही येथील शिक्षक करत आहेत व ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांचे फॉर्मही शिक्षक भरून देताना दिसत आहेत.