मिशन ग्रीन कॉरिडॉर : सोलापुरातील ब्रेनडेड युवकाचे सहा अवयव दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 04:41 PM2019-06-15T16:41:54+5:302019-06-15T16:47:56+5:30
सोलापुरातील यशोधरातून मुंबई, पुण्याला अवयव रवाना
सोलापूर : मागील सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सांगोल्यातील एका युवकाचे सहा अवयव दान केले गेले. त्याचे फुफ्फूस मुंबई तर लिव्हर, किडनी आणि स्वादूपिंड हे पुण्यातील रुग्णाला दान करण्यात आले़ हे अवयव विमानाने हलविण्यात आले. मिशन ग्रीन कॉरिडॉरद्वारे यशोधरा हॉस्पिटलमधून हे अवयव हलवण्यात आले.
ज्ञानेश्वर राजू चव्हाण (वय १९) असे अवयव दान केलेल्या युवकाचे नाव असून शुक्रवारी दुपारी ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, ब्रेनडेड झाल्याने न्यूरोसर्जन डॉ. प्रसन्न कासेगावकर यांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करीत अवयवदानाबाबत प्रबोधन केले. त्यानंतर ज्ञानेश्वरचे फुफ्फूस हे विमानाने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलला पाठुवण्यात आले, त्याचे लिव्हर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला आणि किडनी व स्वादुपिंड दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून पाठविण्यात आले. तसेच डोळे येथील शासकीय रुग्णालय तर एक किडनी यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णाला बसवली जात आहे.
तत्पूर्वी अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीशी यशोधरा हॉस्पिटलने संपर्क साधून अवयवांबाबत माहिती दिली होती. सायंकाळी त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.
वडिलांपाठोपाठ ज्ञानेश्वरचा मृत्यू
- दहावीनंतरचे शिक्षण सोडून फर्निचर आणि अॅल्युमिनियमचे काम करून कुटुंबाला आधार देणाºया ज्ञानेश्वरचा ९ जून रोजी नाझरेजवळ अपघात झाला होता़ तो आणि त्याचे वडील राजू हे दोघे नाझरेत एका कार्यक्रमानिमित्त निघाले होते़ एसटीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली होती़ या अपघातात राजू यांचा जागीच मृत्यू झाला होता तर डोक्याला गंभीर इजा झाल्याने ज्ञानेश्वर हा सोलापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.