आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी
By Appasaheb.patil | Updated: September 6, 2022 15:53 IST2022-09-06T15:53:33+5:302022-09-06T15:53:40+5:30
लोकमत न्युज नेटवर्क

आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी
सोलापूर : ३ फुटांपेक्षा मोठ्या मुर्तीचे संकलन महापालिकेनेच कराव्यात व त्या गणेश मुर्तीचे पावित्र्य जपत सोलापूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ठिकाणी विधीवत गणेश मुर्तीचे विसर्जन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात यावे अशा मागणीचे पत्र आ. प्रणिती शिंदे यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सोलापूर शहरातील सर्वच मध्यवर्ती सार्वजनिक महामंडळांच्या अंतर्गत गणेशोत्सव साजरा करणारी गणेश मंडळे यांच्या ३ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मुर्तीचे विसर्जन शहराबाहेरील खाणीमध्ये करण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे नियोजन असल्याचे समजते. याबाबत शहरातील प्रत्येक विभागात असलेले विसर्जन कुंड, तलाव याठिकाणीच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेश उत्सव मंडळाच्या ३ फुटापेक्षा मोठ्या गणेश मुर्ती एकत्रित जमा करून घ्याव्यात व दरवर्षीचा विसर्जन सोहळा अत्यंत आनंदात, खेळीमेळीने, विनाकलह संपन्न करावा. विसर्जनानंतर गणेश उत्सव मंडळाकडून जमा करुन घेतलेल्या 3 फुटापेक्षा मोठ्या मुर्तीचे पावित्र्य जपत सोलापूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ठिकाणी विधीवत गणेश मुर्तीचे विसर्जन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात यावे असेही आ. शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
याचशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्यकुंड, आवश्यक सोयी-सुविधा, जीवरक्षक यांची परीपूर्ण व्यवस्था करावी व घाईगर्दीत कुणाही निरपराध व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यु होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुक मार्गावर पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन यासह तातडीची मदत यंत्रणा कार्यन्वित करण्यात यावी व कोणतीही दुर्घटना घडणार नाही यादृष्टीने काटेकोर नियोजन करून व्यवस्था उभारण्यात यावी अशाही सुचना पत्रात शेवटी केल्या आहेत.