आमदारांना कमी पडताेय निधी; भाजप खासदारांच्या फंंडात रक्कम पडूनच

By राकेश कदम | Published: March 2, 2023 06:32 PM2023-03-02T18:32:13+5:302023-03-02T18:32:47+5:30

पाठपुराव्याचा अभाव : तीन वर्षांतील पैसे मिळविण्यात अडचण

MLAs are running out of funds The money is deposited in the funds of BJP MPs solapur | आमदारांना कमी पडताेय निधी; भाजप खासदारांच्या फंंडात रक्कम पडूनच

आमदारांना कमी पडताेय निधी; भाजप खासदारांच्या फंंडात रक्कम पडूनच

googlenewsNext

साेलापूर : जिल्ह्यातील काही आमदारांना मतदार संघातील कामांना निधी पुरत नाही. दुसरीकडे भाजपचे खासदार डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा खासदारकीच्या पहिल्या वर्षातील पाच काेटींचा निधी अजूनही पूर्ण खर्च झालेला नाही. खासदारांचे कार्यालय आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारकडून खासदारांना मतदार संघातील विकासकामांसाठी दरवर्षी पाच काेटी रुपयांचा निधी मिळताे. हा निधी खर्च करण्याचे निकषही ठरलेले आहेत. भाजपचे खासदार डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी पाच काेटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळवून घेणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी खासदार, त्यांचे कार्यालय आणि संबंधित यंत्रणांची असते.

पहिल्या वर्षातील निम्मा निधी खर्च व्हायला अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनंतर आणखी दाेन काेटींचा निधी मंजूर झाला. खासदार डाॅ. शिवाचार्य यांनी गेल्या चार वर्षांत एकूण २२० कामे सुचविली. यापैकी १३९ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. सात काेटी रुपयांपैकी ४ काेटी ८२ लाख रुपये खर्च झाले आहेत. अजूनही २ काेटी १८ लाख रुपयांची कामे प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रियेत अडकून असल्याचे जिल्हा प्रशासनाकडील माहितीनुसार दिसून येते.

म्हणून मिळेना जादा निधी
खासदार आणि आमदारांनी मंजूर निधीपैकी ५० टक्के निधी खर्चाचे नियाेजन त्या-त्या आर्थिक वर्षातच करणे आवश्यक असते. त्यानंतरच पुढील आर्थिक वर्षात निधी मिळताे. खासदार डाॅ. शिवाचार्य यांचे कार्यालय पहिल्याच वर्षातील निधी खर्च करण्यात कमी पडले. त्यामुळे त्यांना पुढील वर्षांचा निधी वेळेवर मंजूर झालेला नाही.

चार वर्षांतील कामगिरी

  • जिल्हा प्रशासनाकडील माहितीनुसार डाॅ. शिवाचार्य यांना २०१९-२० वर्षात ५ काेटी रुपये मंजूर झाले.
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षात काेराेनामुळे निधी मिळाला नाही.
  • २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ काेटी रुपये मंजूर झाले.
  • मागील निधी खर्च झाला तरच २०२२-२३ वर्षात ५ काेटी रुपये मिळणार आहेत.


खासदार निंबाळकरांचा ओढा सातारा जिल्ह्यात
माढा लाेकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी गेल्या चार वर्षांत साेलापूर जिल्ह्यात २ काेटी ५४ लाख रुपयांची कामे सुचविली आहेत. यापैकी १ काेटी ९३ लाख रुपये खर्ची पडले. उर्वरित मंजूर निधीतून सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात कामे सुचविली आहेत.

Web Title: MLAs are running out of funds The money is deposited in the funds of BJP MPs solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.