सोलापूरात सकाळी-सकाळी आमदार पोहोचले बांधावर.. संप असूनही कर्मचाऱ्यांनी सुरू केले पंचनामे..
By विठ्ठल खेळगी | Published: March 19, 2023 05:28 PM2023-03-19T17:28:29+5:302023-03-19T17:29:01+5:30
एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना रविवारी तलाठी व ग्रामसेवक अधिकाऱ्यांसोबत जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूर : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रविवारी सकाळी सकाळी माळशिरस तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आमदारांची मोहिते पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली तर पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ. समाधान आवताडे यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली.
एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना रविवारी तलाठी व ग्रामसेवक अधिकाऱ्यांसोबत जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा या दोन विभागांमध्ये जवळपास १८ हजार हेक्टर गारपिटीने बाधित झाले आहे. त्याच्यामध्ये १२ हजार हेक्टर अंबा, द्राक्षे, डाळिंब, चिकू, पेरू अशा फळबागांचा समावेश आहे तर ६ हजार हेक्टर वर असलेला गहू, ज्वारी, मका, हरभरा, पालेभाज्या याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोपाळपूर, कोंढरकी, मुंढेवाडी या गावाला आमदार समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक, प्रांत अधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी भेटी दिल्या. त्याचबरोबर नुकसान झालेले पिकाचे पंचनामे करावे अशा सूचना केल्या. त्यांनतर कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनीही माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी, रेडे भागातील नुकसानीची पाहणी केली.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होतील आणि नुकसान भरपाई दिली जाईल, असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. तसेच आमदारांशी मोहिते-पाटील यांनीही अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या.