पंढरपुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 06:21 PM2021-01-26T18:21:21+5:302021-01-26T18:21:31+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : ऊर्जामंत्री नितीन राऊतसह ऊर्जा सचिव तसेच महावितरण विभागाचे कार्यकारी संचालक यांच्यावर संगनमत करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मनसेच्या वतीने राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे देशभरासह महाराष्ट्रात २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान कठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण कंपनीकडून वीज मीटर रीडिंग साठी प्रतिनिधी पाठवण्यात आले नाही. वीज देयक वितरण करण्यात आली नाहीत. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट अवाजवी रक्कमेची भरमसाठ विद्युत बिले पाठवण्यात आली आहेत.
लाॅकडाऊनच्या काळात वीज बील माफ करणे व तसेच सवलत देण्याची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. मात्र सरसकट वीज बील भरा अन्यथा वीज पुरवठा बंद केला जाईल असा फतवा ऊर्जा मंत्रालयाने काढला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने तक्रार केली आहे. तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गुन्हा दाखल न झाल्यास तहसीलकार्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.