Raj Thackeray : "महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 10:14 AM2024-08-05T10:14:57+5:302024-08-05T10:25:44+5:30

MNS Raj Thackeray : राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.

MNS Raj Thackeray reaction over caste reservation and unemployment | Raj Thackeray : "महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray : "महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. तसेच बाहेरच्या राज्यातील मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकवतात असंही म्हटलं आहे. "महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मला असं वाटतं की यामध्ये जात येते कुठे? महाराष्ट्रातील आपल्या मुला-मुलींना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण बघतो."

"खासगी संस्थांमध्ये आरक्षण आहे का? नेमकं किती मुलांना आरक्षण मिळणार आहे. हे आपण तपासणार आहोत का? माथी भडकवायची. हे सर्व जे राजकारण सुरू आहे ते कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. मतांसाठी राजकारण सुरू आहे. मुलामुलींच्या विचार करत नाही. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे" असं राज यांनी म्हटलं आहे. 

"बाहेरच्या राज्यातील मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकवतात. आपल्या राज्यातील शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतात. सर्व गोष्टी पैशावर येतात. मूळ विषय बाजुला राहतो आणि आपण भरकटतो. हे भरकटणं नाही तर विष कालवणं आहे. लहान मुलं जातीवर बोलतात. महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं. ज्या राज्याने देशाला दिशा दिली ते जातीपातीत खीतपत पडलंय. "

"सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टींमुळे डोकं फिरलं आहे. महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे. २००९ ची भाषणं काढून पाहा. कोणी मला साथ दिली नाही. राजीव गांधींनंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं आहे. मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही."

"यूपीमध्ये महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रात येत नाहीत. म्हणजे काय? इथे नोकऱ्या आहेत हे माझ्या महाराष्ट्रातील पोरांना कळत नाही. आता बेरोजगारांची यादी देखील येत नाही. सर्वच गोष्टी बंद झाल्या. मी नेहमीच म्हणतो महाराष्ट्रातल्या मुलामुलींना प्राधान्य द्या. मोदींनी प्रत्येक राज्य समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. अजून मी बोलायला सुरुवात केली नाही. योग्य वेळी योग्य गोष्ट करावी" असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: MNS Raj Thackeray reaction over caste reservation and unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.