महिला बचत गटाचे कर्ज अन् वीजबिल माफीसाठी मनसेचा बुधवारी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:29 AM2020-11-21T11:29:26+5:302020-11-21T11:36:11+5:30
हजारो महिलांचा असणार सहभाग; मनसेचे नेते बाळा नांदगावकर व दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ करावे व राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने बुधवार २५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे करणार आहेत. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकार, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे अमर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. कोणाच्याही हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आली आहे. अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत. राज्यातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसाय बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत, तरी शासनाने महिला बचत गटातील महिलांचे मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ करावे व लॉकडाउन काळातील विज बिल माफ करावे या मागणीसाठी बुधवारी मोर्चा निघणार असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.